TOP Newsताज्या घडामोडीपुणे

मटण खवय्यांमुळे प्रजननासाठी बोकड मिळेना

पुणे : महाराष्ट्रासह दक्षिण भारतातून बोकडाच्या मटणाच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्यामुळे ग्रामीण भागात प्रजननक्षम बोकडांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. त्यामुळे प्रजननक्षम बोकड दुर्मीळ झाल्याने शेळय़ांच्या प्रजनन क्षमतांवर परिणाम झाल्याचे ग्रामीण भागातून दिसून येत आहे.

आटपाडी येथील शेती परिवार कल्याण संस्थेचे प्रमुख आणि शेळी पालक प्रसाद देशपांडे म्हणाले, ‘तीन-चार शेळय़ा असलेल्या शेतकऱ्यांना वेगाने होत असलेल्या बोकडविक्रीचा फटका बसत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेळय़ांचा कळप आहे, त्यांच्याकडेच प्रजननक्षम बोकड उपलब्ध असतात. त्याचा शेळय़ांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम दिसून येत आहे. सहा महिन्यांहून जास्त वयाचे बोकड प्रजननासाठी उपयोगी असते. मात्र, तीन-चार महिन्यांच्या बोकडांनाच मोठी मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांकडे प्रजननक्षम बोकडच शिल्लक राहत नाही. चार महिने वयाच्या बोकडाचे सरासरी वजन १३ ते १४ किलो भरते, त्याला सात हजार रुपयांपर्यंत पैसे मिळतात’ तासगाव (मु. पो. गव्हाण) येथील शेळी पालक आनंदराव जाधव म्हणाले, ‘कर्नाटक, हैदराबादसह दक्षिण भारतातून मटणासाठी बोकड, शेळय़ा, लहान वयाच्या शेळय़ांना प्रचंड मागणी आहे. चांगले पैसे मिळत असल्यामुळे स्थानिक व्यापारी मिळेल त्या वयाचे बोकड, शेळय़ा खरेदी करून दक्षिण भारतात पाठवित आहेत. त्यामुळे येथील स्थानिक बाजारातही बोकडांची टंचाई जाणवत आहे. .’

ग्रामीण भागात प्रजननक्षम बोकडांची संख्या कमी आहेच. शिवाय जातिवंत, शुद्ध वंशावळीच्या बोकडांची संख्याही कमी होत आहे. त्यामुळे प्रजननावर परिणाम होतो आहे. शेळय़ांची संख्या वाढत असली तरीही वजनात अपेक्षित वाढ होत नाही. अनुवांशिक रोगांचा प्रसार वाढतो आहे. कृत्रिम रेतनाचा चांगला पर्याय सध्या उपलब्ध आहे. पण, त्या बाबत शेतकऱ्यांमध्ये पुरेशी जागृती झालेली नाही.

– डॉ. विलास टाकळेबीएआयएफपुणे

काय होत आहेबोकडाच्या मटणाला मागणी वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून तीन-चार महिने वयाचे बोकड कत्तलीसाठी विकले जातात. बोकडांना चांगला दर मिळत असल्याने वयात आलेले आणि प्रजननक्षम बोकडांचा मोठा तुटवडा जाणवत आहे.

थोडी माहिती..

भारत जगातील एक आघाडीचा शेळी-मेंढी-बोकडाच्या मासांचा निर्यातदार देश आहे. कतार, कुवेत, मालदीव, सौदी अरेबिया आणि ओमान या देशांना सर्वाधिक मांस निर्यात होते. २०२१-२२ मध्ये ४४७.५८ कोटी रुपयांचे ८.६९५.९७ टन शेळी-मेंढी-बोकडाचे मांस निर्यात झाले आहे.

राज्यात दीड कोटींवर शेळय़ा..

’देशात २०१२ च्या पशुगणनेनुसार १३ कोटी ५१ लाख ७० हजार शेळय़ा होत्या. २०१९ च्या पशुगणनेत त्यात वाढ होऊन हा आकडा १४ कोटी ८८ लाख ८० हजारवर गेला आहे.

’महाराष्ट्राचा विचार करता राज्यात २०१२ च्या पशुगणनेनुसार ८४ लाख ४० हजार शेळय़ा होत्या.

’२०१९ च्या पशुगणनेत वाढ होऊन शेळय़ांची संख्या १ कोटी ६० लाखांवर गेली आहे. देशातील एकूण शेळय़ांच्या संख्येत राज्याचा वाटा सरासरी ७.१२ टक्के इतका आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button