ताज्या घडामोडीमुंबई

डोंबिवली स्फोटातील मुख्य आरोपीला पोलीस कोठडी

स्फोटात दहा जण बेपत्ता

कल्याण : डोंबिवली एमआयडीसीतील सोनारपाडा येथील अमुदान कंपनी स्फोटातील मुख्य आरोपी मलया मेहता याना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश ए. के. पठाण यांनी शनिवारी चार दिवसांची (२९ मे) पोलीस कोठडी सुनावली. यावेळी न्यायालयात सरकार पक्ष, कंपनीचे वकील, सामाजिक हक्क संस्थेच्या प्रतिनिधींनी न्यायालयासमोर बाजू मांडली. अमुदान कंपनीचे मलया प्रदीप मेहता (३८), त्याची आई मालती प्रदीप मेहता हे मालक आहेत. मालक मलया हे शुक्रवारी न्यायालयात अटकपूर्व जामीन घेण्यासाठी आले असताना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्याचवेळी नाशिक येथे असलेल्या त्यांच्या आईला चौकशीसाठी गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

मलया मेहता यांना अटकेनंतर शनिवारी दुपारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात मानपाडा आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात सरकार पक्षातर्फे आरोपी मलया मेहता यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. त्याला कंपनीच्या वकिलांनी हरकत घेऊन कंपनीतील उत्पादन प्रक्रियेशी निगडित रासायनिक घटक, बॉयलर आदींच्या रितसर परवानग्या घेऊनच उत्पादन प्रक्रिया केली जात होती. दुर्घटना घडण्यापूर्वी मालक मलया मेहता हे पाऊण तासाच्या कालावधीत अमुदान कंपनीच्या दिशेने पोहचणार होते, पण तत्पूर्वीच कंपनीत स्फोट झाला. त्यामुळे कमीत कमी कोठडी देण्याची मागणी कंपनीच्या वकिलांनी न्यायालयात केली.

सरकार पक्षाने या मागणीला हरकत घेत कंपनीने उत्पादन प्रक्रियेशी निगडित सर्व परवानग्या घेतल्या होते. हे खरे असले तरी प्रत्यक्ष उत्पादन सुरू असताना त्याची काळजी, काटेकोर अंमलबजावणी केली जात होती का. त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. या सर्व प्रकरणाचा पोलिसांना कंपनी स्थळी जाऊन तपास करायचा आहे. त्यामुळे चौदा दिवसांची कोठडी महत्वाची आहे, असे सरकार पक्षातर्फे सांगण्यात आले.

सामाजिक हक्क संस्थेचे ॲड. आकाश कोईनवाड यांच्यातर्फे ॲड. प्रियेश सिंग यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून अमुदान कंपनीतील स्फोटामुळे सामाजिक जीवन ढवळून निघाले. सामान्यांचे जीव या दुर्घटनेत गेले, अनेक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. या सर्व दुर्घटनेचा पोलिसांना सखोल तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून २९ मेपर्यंत आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दहा जण बेपत्ता
अमुदान कंपनी स्फोट प्रकरणात अमुदान कंपनीसह सप्तवर्ण, कॉसमॉस कंपनीतील एकूण १० जण बेपत्ता आहेत. या बेपत्ता कामगारांचे नातेवाईक मानपाडा पोलीस ठाणे, शास्त्रीनगर रुग्णालय, कंपनी परिसरात जाऊन शोध घेण्याची मागणी करत आहेत. बचाव कार्यात सापडलेले सहा मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे आहेत. त्यामध्ये या कामगारांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. मृतदेह आणि त्यांच्या नातेवाईकांच्या फोरेन्सिक, डीएनए चाचण्या केल्यातर जळीत मृतदेह कोणत्या कुटुंबातील आहेत ते स्पष्ट होणार आहे. त्या प्रक्रिया आता सुरू करण्यात आल्या आहेत, असे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले. आपल्या कुटुंबातील सदस्य बेपत्ता असल्याने कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button