breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1 हजार 690 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वितरण’;कृषी मंत्री धनंजय मुंडे

नागपूर: राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याबाबत प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा 25 टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून उर्वरित रुपयांचे वितरण वेगाने सुरू आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानपरिषदेत दिली.

24 जिल्ह्यात स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित विमा कंपन्यांना 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या. मात्र, त्याविरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केले होते. ते फेटाळून लावल्यानंतर काही पीक विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले होते. यादरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ, कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन 21 दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक बाबींच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांच्या पुढे सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले. काही विमा कंपन्यांचे अपील अद्याप सुनावणी स्तरावर आहेत, ते अपील निकाली निघाल्यानंतर मंजूर पीक विम्याच्या रकमेत आणखी मोठी वाढ होणार आहे, असेही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – ‘कला केंद्रांच्या नियंत्रणासाठी एसओपी बनवण्यात यावी’;उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

विविध जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी विमा रक्कम मिळाल्याच्या बाबी काही सदस्यांनी उपस्थित केल्या. त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम एक हजारापेक्षा कमी असेल, त्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये पीक विमा दिला जाईल. याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे  कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

पीक विम्यासंदर्भात विधानपरिषदेत आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे, विक्रम काळे, सतीश चव्हाण, अरुण लाड, जयंत आसगावकर, प्रा. राम शिंदे, प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी यांसह विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनीही प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता.

आमदार एकनाथ खडसे यांनी केळी पीक विमा व आमदार जयंत पाटील यांनी भात शेतीचे झालेले नुकसान याविषयावरील चर्चेत सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button