breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘शिवसेनेच्या टिझरमध्ये राज ठाकरे यांच्या सभेतील गर्दीचं फुटेज’

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख यांच्या १४ मे रोजी होणाऱ्या सभेच्या टिझरवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्षेप घेतला आहे. या टिझरमध्ये असलेली गर्दी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील सभेतील असल्याचा दावा मनसेचे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी केला आहे. आता कळलं असली कोण आणि नकली कोण, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला (Shivsena) लगावला आहे. आता शिवसेना यावर काय स्पष्टीकरण देणार हे पाहावे लागेल.

मात्र, आता या मुद्द्यावरून मनसेचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. असली, नकली म्हणणाऱ्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करा. काहीतरी अस्सल तुमचे असुद्या. इतके ही नकली होऊ नका. अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का, असा सवाल गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमधून उपस्थित केला आहे. तसेच आपली चूक लक्षात आल्यावर शिवसेनेने टिझरचं ट्विट डिलिट केल्याचेही गजानन काळे यांनी म्हटले आहे.

१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली होती. या सभेला राज्यभरातून मनसैनिक आले होते. पोलिसांनी या सभेसाठी केवळ १५ हजार श्रोत्यांची मर्यादा आखून दिली होती. मात्र, प्रत्यक्षात या सभेला मोठी गर्दी जमली होती. राज ठाकरे यांच्या सभांना जमणारी गर्दी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र, आता शिवसेनेने आपल्या सभेच्या प्रसिद्धीसाठी राज ठाकरे यांच्या सभेचं फुटेज वापरल्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी १४ मे रोजी उद्धव ठाकरे मुंबईच्या बीकेसी मैदानावर सभा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या सभेचे एकापाठोपाठ टिझर लाँच करून शिवसेनेकडून जोरदार वातावरणनिर्मिती केली जात आहे. तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही शिवसेनेकडून टीका केली जात आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर १० जूनला लगेच आदित्य ठाकरेही अयोध्येत जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेनेकडून, ‘असली आ रहा है, नकली से बचो’, अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते.

शिवसेनेच्या टिझरमध्ये नेमकं काय?

अवघ्या १५ सेकंदाच्या या टिझरच्या सुरुवातीलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण दिसते. मी शिवसेनाप्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे. म्हणूनच मी शिवसेनाप्रमुख आहे, असे बाळासाहेब ठाकरे बोलताना दिसत आहेत. तर साहेबांवर श्रध्दा असणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्त्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, असे आवाहन या टिझरच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button