ताज्या घडामोडीमुंबई

ठाण्यात शिवसेना -राष्ट्रवादीत प्रभाग रचनेवरून मतभेद

ठाणे | महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेला प्रभाग रचनेवरून सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचा नवा अंक शुक्रवारी झालेला प्रभाग हरकती सुनावणीदरम्यान दिसून आला. दिव्यातील प्रभाग संख्या कमी करून मुंब्र्यातील प्रभाग संख्या वाढविण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हा दावा फेटाळून लावला.

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत पालिका निवडणुक विभागाला प्राप्त १ हजार ९६४ हरकती प्राप्त झाल्या होत्या. या सर्व हरकतींवर शुक्रवारी घोडबंदर येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान लोकमान्यनगर भागाचे पाच प्रभागांमध्ये विभाजन करून नागरिकांवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप करत या भागातील त्रुटी दूर करण्याची मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केली.

वृंदावन सोसायटी परिसरातील काही इमारती वगळून राबोडी भागांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी या सुनावणीदरम्यान केला. राबोडी येथून कोळीवाडा परिसर वगळून वृंदावन परिसरात जोडण्यात आला असून हा परिसर त्या भागातून वगळण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केली.

चेंदणी पूर्व आणि पश्चिम तसेच आनंदनगर परिसर कोपरी प्रभागातून वगळू नयेत, अशी मागणी नागरिकांनी केली. चेंदणी पूर्व परिसर पश्चिम भागाला सोडल्यास पिन कोड क्रमांक बदलेल आणि त्याचा त्रास सर्वच नागरिकांना होईल, असेही नागरिकांनी सांगितले.

चार सदस्यांचा प्रभाग असलेल्या साबे, दिवा या प्रभागातून सर्वाधिक म्हणजेच ३३५ हरकती प्राप्त झाल्या होत्या.

भाजपची टीका

महापालिका प्रभागरचना सत्ताधारी पक्षाच्या सोयीनुसार करण्यात आली असून यात सत्तारूढ पक्षाचा हस्तक्षेप झाल्याचा आरोप भाजपचे सुभाष काळे यांनी केला. सर्व प्रभागांची लोकसंख्या समसमान असणे गरजेचे होते, मात्र या प्रभाग रचनेत असे दिसून येत नाही, तसेच एकाच प्रभागांमध्ये तिन्ही जागांवर आरक्षण पडण्याची भीती आहे, असे भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button