breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

पवारांच्या बारामतीत गुंडगिरी; मोटार अडवून फिल्मी स्टाईलने एकावर जीवघेणा हल्ला

पुणे : सर्वांना बारामती सुरक्षित वाटली पाहिजे. बारामतीत गुंडगिरी व दादागिरी मी खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला होता. मात्र पवारांच्याच बारामतीत आता गुंडगिरी पाहायला मिळत आहे.

शाळेच्या गॅदरिंगचा कार्यक्रम पाहून मोटारीतून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी या मोटारीवर हल्ला केला. मोटारीतील व्यक्तिच्या पायावर जोरदार मारहाण करत पाय फ्रॅक्चर केला. त्यानंतर त्याच गाडीतून त्यांना लाकडी रस्त्याला नेले. तेथून पुन्हा मारहाण करत पिंपळीतील एका कंपनीजवळ आणून सोडले. वसंत लक्ष्मण साळुंके (वय ४२, रा. २९ फाटा, गुणवडी, ता. बारामती) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. त्यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शनिवारी (८ एप्रिल रोजी) रात्री ही घटना घडली. साळुंके यांनीच याबाबत तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या दिवशी ते मेहुणे गणेश सुर्यवंशी यांच्यासह सावळ येथे शाळेच्या गॅदरिंगचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. तो संपल्यावर सुर्यवंशी पुढे गेले. फिर्यादी साळुंके हे त्यांची मोटार (एमएच-४२, एच-०९१७) मधून लाकडी रस्त्याने बारामती बाजूकडे येत असताना बारामती अॅग्रोच्या कन्हेरी फार्मजवळ पाठीमागून एक मोटारसायकल आली. त्यावर तिघे बसले होते. त्यांनी अंगात काळे टी शर्ट घातले होते. त्यांनी मोटारीमागे येत मोटारीवर दगड फेकून मारला. त्यामुळे काच फुटली. तेवढ्या वेळात त्यांनी दुचाकी मोटारीला आडवी लावली. दुचाकीवरून खाली उतरत त्यांना मोटारीबाहेर ओढून लाकडी काठीने मारहाण केली. एकाने डोक्यात काठी मारली. त्यामुळे डोक्यातून रक्त येवू लागले. तिघांनी सालुंके यांना धरून मोटारीच्या पाठीमागील सीटवर बसवले. रस्त्यापासून २०० फूट आतमध्ये शेतात गाडी नेली. तेथे गेल्यावर आज तुला जीवंत सोडत नाही असे म्हणत पायाच्या नडगीवर काठीने बेदम मारहाण करण्यात आली. यात साळुंके यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांना पुन्हा मोटारीत घालत बारामती रस्त्याला आणून टाकण्यात आले.

या तिघांनी काठीने केलेल्या मारहाणीत डोक्यात, डाव्या डोळ्यावर डाव्या हातावर बेदम मार लागला. तसेच पाय फ्रॅक्चर झाला. त्यांनी सोडून दिल्यावर फिर्यादीला उमेश मोरे, विकास शिंदे यांनी तेथून बारामतीत आणत उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी तिघांविरोधात प्राणघातक हल्ला, अपहरण आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button