breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

आमच्या आमदारांच्या जीवाला धोका : एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आता दिल्ली दरबारी धाव घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेने बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांना अपात्र ठरविण्याच्या कायदेशीर हालचाली सुरु केल्या आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन ठाकरे सरकारविरोधात संघर्षाला तयार असल्याचं सूचित केलं आहे. शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेत बंडखोर आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर विधानसभा उपाध्यक्ष अधिकारांचा गैरवापर करत असल्याचं सांगत नरहरी झिरवाळ यांच्यावरही आक्षेप घेतला गेला आहे. याचिकेतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांच्या प्रक्षोभक वक्तव्यांच्या व्हिडिओ लिंक्स याचिकेत नमूद केल्या आहेत. त्यातून आमच्या आमदारांच्या जीवाला शिवसेनेच्या नेत्यांपासून धोका असल्याचे म्हटले आहे.

३८ आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला, बहुमत सिद्ध करायला सांगा

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना पक्षादेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली होती. या कारवाईला एकनाथ शिंदे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत आव्हान दिले होते. या याचिकेतील महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. या याचिकेत नमूद केल्यानुसार एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेच्या ३८ आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला आहे. त्यामुळे विधानसभेत ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावे, असे पत्रही एकनाथ शिंदे गट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवणार असल्याची माहिती आहे.

सरकार टिकविण्यासाठी उपाध्यक्षांच्या अधिकाराचा गैरवापर

‘अल्पमतात आलेलं सरकार सत्ता टिकवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांच्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत,’ असा आरोप शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत केला आहे. म्हणजेच नरहरी झिरवाळ यांच्या कार्यशैलीवर एकनाथ शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या टार्गेटवर संजय राऊत

एकनाथ शिंदे गटाने इतकी पडझड होऊनही शिवसेनेची खिंड एकाकी लढवणाऱ्या संजय राऊत यांनाही घेरण्याची तयारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे बंडखोर आमदारांना सातत्याने आव्हान देत आहेत. त्यांच्याविरोधात आक्रमक भाषेत वक्तव्यं करुन बंडखोर आमदारांविरोधात संजय राऊत वातावरणनिर्मिती करत आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटाने आता संजय राऊत यांनाच घेरायचे ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत एकनाथ शिंदे गटाने आमच्या आमदारांच्या जीवाला शिवसेनेच्या नेत्यांपासून धोका असल्याचे म्हटले आहे. याचा पुरावा म्हणून एकनाथ शिंदे गटाने याचिकेत संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांविरोधात केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यांच्या व्हिडिओ लिंक्स याचिकेत नमूद केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button