breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: राज्यात सात केंद्रीय पथके

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेल्या १५ राज्यांतील ५० जिल्हे आणि महापालिका शहरांमध्ये पथके पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यापैकी महाराष्ट्रात सात केंद्रीय पथके पाठविण्यात येणार असून, प्रतिबंधित क्षेत्रांत तांत्रिक मदत पुरविणे, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ही पथके करणार आहेत.

तमिळनाडूमध्ये ७, आसाममध्ये ६, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशामध्ये प्रत्येकी ५, तेलंगण, हरयाणा, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये प्रत्येकी ४, पश्चिम बंगाल, दिल्ली, उत्तराखंड, गुजरातमध्ये प्रत्येकी ३ केंद्रीय पथके पाठवण्यात येणार आहेत. प्रत्येक पथकामध्ये तीन सदस्य असतील. दोन आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व संयुक्त सचिव दर्जाचा नोडल अधिकारी यांचा समावेश असेल. ही पथके संबंधित जिल्हा वा शहरामधील आरोग्य केंद्रांना भेट देऊन पाहणी करतील व गरजेनुसार वैद्यकीय सल्ला देतील. स्थानिक प्रशासनाने केंद्रीय पथकाशी समन्वय साधून करोनानियंत्रणाचे उपाय व निर्णय घेणे अपेक्षित आहे. करोनासंर्भातील सर्वेक्षण, नियंत्रण, चाचणी आणि उपचार असे चार स्तरीय धोरण अवलंबले जात असून, त्यासाठी केंद्रीय पथकाची मदत घेण्यात येणार आहे.

काही राज्यांमध्ये अपेक्षित चाचण्या होत नसल्याचे केंद्राला आढळले आहे. चाचण्यांचे निष्कर्ष वेळेत न येणे, १० लाख लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाण कमी असणे आणि रुग्णवाढीच्या तुलनेत वैद्यकीय सुविधा कमी असलेल्या शहरांवर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. मृतांचे प्रमाण अधिक आणि रुग्णवाढ वेगाने होत असलेल्या भागांत करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकार ही पथके पाठवणार आहे. अनेक जिल्हा तसेच महापालिका शहरांमध्ये करोनासंबंधित पथक अस्तित्वात आहे. त्यांच्याशी केंद्रीय स्तरावरून समन्वय साधला जात आहे.

२४ तासांत ९,९८७ रुग्ण

देशात गेल्या २४ तासांत ९,९८७ रुग्णांची भर पडली. त्यामुळे देशभरात करोना रुग्णांची संख्या २ लाख ६६ हजार ५९८ झाली.

५ जूनपासून प्रतिदिन रुग्णांमध्ये सुमारे दहा हजारांनजीक वाढ होत आहे. आतापर्यंत एकूण १ लाख २९ हजार २१४ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत २६६ मृत्यू झाले असून, मृतांची एकूण संख्या ७,४६६ वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button