breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#CoronaVirus: ‘रक्तद्रव उपचार’साठी परवानगीचा सांगलीत प्रयत्न

करोनाबाधितांना सर्वोत्तम अत्याधुनिक उपचार देऊन कोणत्याही स्थितीत रुग्ण दगावणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, अशा सूचना जिल्ह्य़ाचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा बठकीमध्ये दिल्या. तसेच रक्तद्रव उपचाराबाबत (प्लाझ्मा थेरपी) परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच करोनामुक्त झालेल्यांचे रक्तही संकलित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी आरोग्य विभागाला दिल्या.

जिल्ह्य़ातील करोनाची सद्यस्थिती व अन्य अनुषंगिक बाबींचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस आदींसह सर्व विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्य़ाच्या  विविध ११ ठिकाणी २५५ व्यक्ती विलगीकरण कक्षामध्ये दाखल  आहेत. त्यांची दररोज लक्षणे तपासणी, कार्यरत मनुष्यबळाला आवश्यक सुरक्षेची पुरेशा साधनांची उपलब्धता याचाही आढावा पालकमंत्री पाटील यांनी यावेळी घेतला.  बाधित रुग्णांना अत्याधुनिक उपचार देण्यात यावेत, प्लाझ्मा थेरपीसारखी उपचार पध्दती उपयोगात आणण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून आवश्यक परवानगी त्वरित मिळवा. करोनामुक्त झालेल्या रुग्णांचे रक्त संकलन करा असेही त्यांनी निर्देशित केले.

जिल्ह्य़ात सध्या सुमारे ४१ हजार ७०० लोक बाहेरून आले आहेत. यामध्ये जवळपास १८ हजार लोक मुंबई, ठाणे, पुणे या करोना संसर्गाचा हॉटस्पॉट असणाऱ्या भागातून आले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांनी साथसोवळ्याचे व वैयक्तिक स्वच्छतेचे जागृकतेने काटेकोर पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आपत्ती निवारणाबाबतचे आदेश

मान्सून काळात लोकांना पाण्याची पातळी तत्काळ कळविण्यात यावी व अनुषंगिक खबरदारी घेण्याबाबत सूचित करता यावे यासाठी सक्षम यंत्रणा उभारा. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रसंगी नागरिकांना व जनावरांना स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक पूर्व नियोजन करावे. तसेच बचाव सामग्रीच्या दृष्टीने स्वयंसिध्द राहावे असे आपत्ती निवारणाबाबतचे आदेश देण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button