breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: आपण कधी गंभीर होणार? कोरोनाच्या बाबतीत सतर्कता बाळगा

नागपूर | महाईन्यूज

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सोमवारपासून नागपूर शहरात साथरोग कायदा लागू करून कलम १४४ ची नोटीस बजावली आहे. विविध कार्यक्रम, रॅली, प्रदर्शनांना परवानगी नाकारली आहे. तरीही असे कार्यक्रम आयोजित केल्यास कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. सरकार वारंवार गर्दी टाळण्याचे आवाहन करीत आहे. सतर्क राहा, सावधगिरी बाळगा अशा सूचना दिल्या जात आहेत. एकीकडे कोरोनामुळे अख्खे प्रशासन वेठीस धरले असताना, नागपूरकर सर्रास त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

कोरोनाचा प्रभाव कमी होण्यासाठी प्रशासनाने काही काळ अनावश्यक गोष्टींना टाळा, असे आवाहन केले आहे. पण सकाळी सकाळी पोह्यांच्या ठेल्यावरचे चित्र बघून आपण कधी गंभीर होणार? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. सकाळी रस्त्याच्या कडेला पोहे विक्रेत्यांकडे तरुण, तरुणींपासून मोठ्यांचीही गर्दी दिसून आली. काही ज्येष्ठही उघड्यावर मनसोक्त गप्पाटप्पा करीत पोह्यावर ताव मारत होते. पोहे विक्रेता उघड्यावर पोहे बनवीत होता. पोहे खाल्ल्यानंतरच्या प्लेट पाण्याने केवळ विसळून पुन्हा त्यात पोहे देत होता. आरोग्य विभागाने दोन मीटरचे अंतर पाळा, असे आवाहन केले आहे. मात्र काही तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक गर्दी केल्यासारखे मस्त पोहे खात होते. शहरातील आशीर्वादनगर, म्हाळगीनगर, सक्करदरा, मानेवाडा चौक, मेडिकल चौक, अयोध्यानगर या रस्त्यावरील चाट सेंटर, इडली-डोसा विक्रेते, चहा विक्रेते यांच्या टपरीवरही असेच चित्र दिसून आले. ना नागरिकांना आरोग्याची भीती होती, ना विक्रेत्यांना. रस्त्यावरील अस्वच्छ वातावरण, उघड्यावरील अन्नपदार्थ हेसुद्धा कोरोनासाठी घातक ठरू शकते, याचेही भान नागरिकांना नसल्याचे दिसून आले.
सायंकाळच्या सुमारासही बजाजनगर, आयटी पार्क, अंबाझरी, शंकरनगर, या भागातही लागणारे चायनीजचे ठेले, आयस्क्रीम विक्रेते यांच्याही दुकानांवर तरुणाईची गर्दी दिसून आली. येथेही विक्रेते कुठल्याही खबरदारीशिवाय आपला व्यवसाय करीत होते. तरुण मंडळीही ग्रुपने खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button