breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#Covid-19: करोनामुळे ६०३ बालकांनी पालक गमावले

  • बालसंगोपन योजनेसाठी आत्तापर्यंत ३५२ पात्र

नगर |

करोना संसर्गामुळे जिल्ह्यतील ६०३ बालकांनी पालक गमावले. १८ बालके पूर्ण निराधार झाली तर आई किंवा वडील या दोन्हीपैकी एक पालक गमावलेली ५८५ बालके आहेत. वडील गमावलेले ५२५ व आई गमावलेली ६० बालके आहेत. या सर्वांपैकी केवळ २ बालकांना बालगृहात दाखल करावे लागले आहे तर इतर सर्व बालकांची जबाबदारी त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनी स्वीकारली आहे. आई किंवा वडील गमावले अशा ६०३ बालकांपैकी ३५२ बालकांची पडताळणी बाल कल्याण समितीने आत्तापर्यंत केली असून ही बालके बालसंगोपन योजनेसाठी पात्र ठरली आहेत. या बालकांच्या खात्यावर दरमहा ११०० रुपये अनुदान ते १८ वर्षांंचे होईपर्यंत राज्य सरकारकडून वर्ग केले जाणार आहेत. जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून ही माहिती उपलब्ध झाली.

करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये आई किंवा वडील किंवा दोन्ही पालक गमावले अशा बालकांची काळजी व संरक्षण घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती गटाची निर्मिती करून त्यामध्ये महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बाल संरक्षण शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), चाईल्ड लाइन या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदींचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांची समिती सचिवपदी नियुक्त करण्यात आली आहे. या कृती गटाकडून मार्च २०२० पासून पालक गमावलेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे.

गाव पातळीवरील यंत्रणा, पालिका, महापालिका, रुग्णालये यांच्याकडून ही माहिती घेतली जात आहे. चाईल्ड लाइन संस्था, बाल संरक्षण अधिकारी गृहभेटी करून कुटुंबाची, बालकांची माहिती घेतात. त्यानंतर बाल कल्याण समिती पुढे बालकांची पडताळणी केली जाते. त्यानंतर बालसंगोपन योजनेसाठी बालके पात्र ठरवली जातात. ६०३ बालकांपैकी ३५२ बालकांची पडताळणी आत्तापर्यंत झाली आहे. करोना संसर्गामुळे २९६ महिला विधवा झाल्या आहेत. या महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत प्रयत्न केले जात आहेत. त्यातील २३२ महिलांना अनुदान मंजूर झाल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.

जिल्ह्याची आकडेवारी

  • एका पालकाचा मृत्यू झालेली बालके— ६०३
  • दोन्ही पालक गमावलेले —१८.
  • आई गमावलेली बालके—६०.
  • वडील गमावलेली बालके—५२५.

    ‘त्या’ ५६ बालकांना लाभ

बालसंगोपन योजना यापूर्वीपासून अनाथ, निराधार बालकांसाठी सुरू आहे. आता त्यामध्ये करोना संसर्गाने पालक गमावलेल्या बालकांचा शोध घेऊन समावेश केला जात आहे. शिवाय करोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे शैक्षणिक शुल्क देण्याच्या योजनेचाही त्यामध्ये समावेश केला गेला आहे. सध्या जिल्ह्यतील १३०८ बालके बालसंगोपन योजनेचे लाभार्थी आहेत. दुर्धर आजार असलेल्या बालकांनाही त्याचा लाभ मिळतो. ज्यांचे आई—वडील कारागृहात आहेत, अशा जिल्ह्यतील ५६ बालकांना या योजनेचा लाभ सध्या दिला जात आहे.

  • नागरिकांनी संपर्क साधावा

करोना संसर्गामुळे पालक गमावलेल्या बालकांचा कृती गटाकडून शोध घेतला तर जात आहेच शिवाय नागरिकांनीही त्यांच्या आसपास आढळलेल्या अशा बालकांची माहिती चाइल्ड लाइन (दूरध्वनी क्रमांक १०९८) किंवा बाल संरक्षण अधिकाऱ्यांना द्यावी. या बालकांनाही बालसंगोपन योजनेचा लाभ मिळू शकतो. जिल्ह्यत आत्तापर्यंत आढळलेल्या सर्वच बालकांना त्यांच्या नातेवाइकांनी स्वीकारले आहे.

– महेश सूर्यवंशी, केंद्र समन्वयक, चाइल्ड लाइन तथा सदस्य, कृती गट नगर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button