breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विकासाची गती कायम ठेवण्यासाठी विविध विभागांच्या कामकाजात समन्वय हवा – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी |महाईन्यूज|

विकासाची गती उत्तम राखण्यासाठी विविध विभागांच्या कामकाजातील समन्वय, योग्य कार्यपध्दती आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा आवश्यक आहे असे प्रतिपादन आयुक्त राजेश पाटील यांनी केले. महापालिकेच्या नेहरुनगर येथील क क्षेत्रीय कार्यालयास आज आयुक्त राजेश पाटील यांनी भेट देऊन प्रभाग क्र. २ आणि ६ मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

प्रभाग स्तरावरील समस्या, पावसाळी कामे, अतिक्रमण तसेच हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, कोरोना विषयक नियोजन अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीस क प्रभाग अध्यक्ष राजेंद्र लांडगे, नगरसदस्या अश्विनी जाधव, यशोदा बोईनवाड, सारिका बो-हाडे, सारिका लांडगे, नगरसदस्य राहुल जाधव, वसंत बोराटे, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता नितीन देशमुख, संजय भोसले, संजय घुबे, रामनाथ टकले, आदींसह स्थापत्य, विद्युत, स्थापत्य क्रीडा, पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, नगररचना, स्थापत्य उद्यान, झोनिपु स्थापत्य, आरोग्य, जलनि:सारण, अतिक्रमण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जाधववाडीतील डंपिंग स्टेशनचे स्थलांतर करावे, झोपडपट्टी असणा-या उंच भागातील धोकेदायक ठिकाणी सुरक्षा भिंत बांधावी, उद्याने विकसित करावी, समाविष्ट गावांमध्ये विकसित मैदानांचा अभाव असून त्याकडे लक्ष द्यावे, औद्योगिक भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करावे, फुटपाथवर अतिक्रमण करणा-या हॉकर्सवर कारवाई करावी, पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी असणा-या भागामध्ये नवीन पाण्याची टाकी बांधण्यात यावी, ओपन जिम बांधण्यात यावी, चौक आणि रस्त्यांचे सुशोभिकरण करावे, कामासांठी पुरेशी तरतूद उपलब्ध करुन द्यावी, पाणी पुरवठा सुरळीत करावा, नाले साफसफाईची कामे तातडीने करावी, डीपी रस्ते विकसित करावे, विविध उद्यानांची कामे, जलनि:सारणची कामे तसेच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा अशा सूचना नगरसदस्यांनी यावेळी मांडल्या. या बैठकीत आलेल्या सूचना आणि मुद्दयांबाबत तसेच झालेले, चालू असलेले आणि भविष्यात हाती घेण्यात येणा-या प्रकल्पांच्या कामांबाबत आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांकडून माहिती घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, प्रभागातील दीर्घकालीन समस्येबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असते. मोठे प्रकल्प राबविताना त्याचे परिपूर्ण नियोजन केले पाहिजे. त्यामुळे अशा प्रकल्पांमध्ये त्रुटी राहण्याची शक्यता कमी असते. कोणत्याही भागामध्ये विकास कामे करताना अंतर्गत समन्वय ठेऊन नागरिकांच्या गरजा आणि मागण्यांचा त्यात अंतर्भाव असणे गरजेचे असते, असे ते म्हणाले. शहरातील मोठ्या रस्त्यांचे सुशोभिकरण करताना आकर्षक वृक्षारोपण करण्याचे नियोजन असून त्यात एकसंघपणा तसेच विविधता याचा समतोल राखला जाईल. प्राधान्याने हॉकर्सचे नियोजन करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले. ताब्यात आलेल्या आरक्षित जमिनींवर अतिक्रमण होऊ नये याची खबरदारी घ्यावी, लोंबकळणा-या विजेच्या तारा धोकादायक ठरु शकतात त्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अडथळा ठरणा-या फांद्यांची छाटणी करुन घ्यावी, पाणी पुरवठ्याचे सुयोग्य नियोजन करावे, नालेसफाईचे काम तातडीने पूर्ण करावे असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासनाला दिले. प्रभाग स्तरावरील कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक, कोविड चाचणी केंद्र याबद्दल क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांनी बैठकीत माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button