TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

जोडलेली माणसे हीच राजकारणी, उद्योजकांची संपत्ती- नितीन गडकरी

मुंबई: कोणत्याही प्रकल्पाचे यश हे माणसांमध्ये निर्माण होणाऱ्या नात्यांवर अवलंबून असते. राजकारण असो किंवा उद्योग जोडलेली माणसे हेच बलस्थान असते. नेत्याचे अगदी तळातील व्यक्तीशी चांगले संबंध असतील, अगदी तळातील व्यक्तीलाही आदर दिला तर कार्यक्षमता वाढते, असा कानमंत्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांना दिला.

 आयआयटी बॉम्बे येथे ग्लोबल लिडरशीप समिटचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी संस्थेचे संचालक शुभाशिष चौधरी उपस्थित होते.  यावेळी गडकरी यांनी विविध प्रकल्प साकारताना आलेले अनुभव सांगताना विद्यार्थ्यांना नेतृत्वाचे धडे दिले. जोडलेली माणसे ही संपत्ती असते. ती तुम्हाला यशापर्यंत पोहोचवतात. माझ्या माणसांनीच मला कायम यश मिळवून दिले. येत्या निवडणुकीतही मी कुठेही छायाचित्र लावणार नाही, फलक लावणार नाही, कुणाला काही देणार-घेणार नाही तरीही लाखो मतांनी निवडून येईन, असे गडकरी यांनी सांगितले.

डिग्री सुशिक्षित करते, सुसंस्कृत नाही. तत्वे ही शिक्षणाइतकीच किंबहुना अधिक महत्वाची आहेत, असे सांगून त्यांनी समाजाभिमुख संशोधन करण्याचे आवाहन केले. तुमचे ज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यातूनच या देशाचे पुननिर्माण होईल. मात्र, तंत्रज्ञान विकसित करताना ते सामाजिक गरजेनुसार विकसित होणे आवश्यक आहे. कोणत्या भागात काय पिकते, कोणता कच्चा माल मिळू शकतो याचाही विचार उत्पादन करताना होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उत्पादन हे किफायतशीर असणेही गरजेचे असते. या सगळय़ाचा विचार करून संशोधन आणि त्यानंतर संशोधन हे उत्पादनापर्यंत पोहोचायला हवे, असे ते म्हणाले.

‘दिल्लीचे पाणी चांगले नाही’

  मी राजकारणात गेल्यानंतर दिल्लीला गेलो. आजपर्यंत अनेक लोकांना भेटलो. खूप मोठी वाटणारी माणसे खुजी निघाली. छोटी वाटणारी माणसे खूप उत्तुंग होती, असे अनेक अनुभव घेतले. पण दिल्लीचे पाणी चांगले नाही. महाराष्ट्र अधिक चांगला, दिल्लीत फार हुशारीने काम करतात लोक. आता ही हुशारी कशी ते जाणकारांनी समजून घ्यावे, अशी टिप्पणी गडकरी यांनी केली आणि सभागृहात हशा पिकला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button