breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी! तालुक्यातील चार गावांना पुराचा वेढा

चाळीसगाव |

चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी झाली. यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदी, उपनद्यांना व नाल्यांना मोठा पूर आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीकाठच्या चार गावांना पुराचा वेढा पडला आहे. त्यात दोघे अडकले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘एसडीआरएफ’चे पथक बचावकार्यासाठी रवाना झाले आहे. मुंदखेडा, वाकडी येथील जनावरे वाहून गेली आहेत. दरम्यान, कन्नड घाटात दरड कोसळल्याने घाटरस्ता बंद करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यात सोमवारी (३० ऑगस्ट) मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे छोटे-मोठे बंधारे, पाझर तलाव व इतर छोट्या-मोठ्या प्रकल्पांंतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे. सद्यःस्थितीत जामदा बंधार्‍यातून १५०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. दुपारनंतर त्यात मोठी वाढ येऊन पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • ढगफुटीमुळे गावांमध्ये शिरले पुराचे पाणी

गोताळा डोंगर भागात ढगफुटी झाली. ढगफुटीसदृश पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. वाघडू गावातही पाणी शिरले. पावसाची संततधार कायम राहिल्याने मंगळवारी (३१ ऑगस्ट) पहाटे तीन ते चारच्या सुमारास वालझरी नदीला मोठा पूर आला. पावसामुळे हाहाकार पाहायला मिळाला. वाघडूसह वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव जावळे या गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. मध्यरात्री व पहाटे पूर आल्याने पशुधनाचे मोठे नुकसान झाले असून, जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.

  • कजगावसह वीस गावांचा संपर्क तुटला

चाळीसगाव तालुक्यात मध्यरात्री ढगफुटीसद़ृश पाऊस झाला. भडगाव तालुक्यातील कजगाव येथील तितूर नदीला महापूर आला आहे. नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरल्याने सुमारे वीस गावांचा संपर्क तुटला आहे. पिकांसह शेती वाहून जाण्याची शक्यता असून, नदीवरील पुलाचे संरक्षक लोखंडी कथडे वाहून गेले. वीजखांबही उन्मळून पडले. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. कजगावला पाण्याचा वेढा पडला असून, त्यामुळे जुने गाव ते नवे गावातील वाहतूक व ग्रामस्थांचा एकमेकांचा संपर्क तुटला आहे. खाजोळा, भोरटेक, पिंप्री, वडगाव येथील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रथमच एवढा महापूर तितूर नदीला आल्यामुळे सकाळपासून बघ्यांची गर्दी झाली होती.तितूर नदीला प्रथमच पाणी आल्याने गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावातील ट्रान्स्फॉर्मर पाण्यात असून, त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button