TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

चांगल्या सवलतींमुळे गुजरातची निवड ; वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचे प्रतिपादन, महाराष्ट्रातही संलग्न प्रकल्प

मुंबई : अधिक चांगल्या सोयीसुविधा व सवलतींचे पॅकेज दिल्याने हा प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करण्याचा निर्णय आम्ही आधीच घेतला होता, असे नमूद करीत वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्रात सेमी कंडक्टर संलग्न प्रकल्प सुरू करण्याचे जाहीर केले. महाराष्ट्र सरकारने जुलैमध्ये अनेक सवलती देऊ केल्या, पण गुजरातचे पॅकेज अधिक आकर्षक दिले होते व त्यांना होकार कळविला होता, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

फॉक्सकॉनच्या घोषणेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून विरोधकांनी केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे करून आपल्या अकार्यक्षमतेचे प्रदर्शन केले, अशी टीका केली आहे.

वेदांत-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यावर फॉक्सकॉनशी चर्चा झाली व काही सवलती देण्यात आल्या. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे आरोप महाविकास आघाडीतील पक्षांनी केले आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती.

या पार्श्वभूमीवर अग्रवाल यांनी महाराष्ट्र सरकारनेही हा प्रकल्प राज्यात येण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न केले व सवलतीही देऊ केल्या होत्या, असे सांगितले. या प्रकल्पासाठी गेली दोन वर्षे चर्चा सुरू होत्या आणि काही राज्य सरकारांनी विविध सोयी सवलती देऊ केल्या होत्या. सर्व बाबींचा विचार करून गुजरात सरकारला होकार देण्यात आला. महाराष्ट्र हे आमच्यासाठी महत्त्वाचे राज्य असून संलग्न प्रकल्पांसाठी येथेच गुंतवणूक करण्यात येईल, असे अग्रवाल यांनी नमूद केले आहे.

फॉक्सकॉन-वेदांत समूहाने संलग्न प्रकल्पांसाठी महाराष्ट्राची निवड केल्याने फडणवीस यांनी आभार मानले. महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू, असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात हरित तेलशुध्दीकरण प्रकल्पातून सुमारे साडेतीन लाख कोटींची गुंतवणूक होणार असताना त्याला कोणी विरोध केला व कोणी हा प्रकल्प लांबविला, असा सवालही फडणवीस यांनी केला असून स्वत: आधी कार्यक्षम व्हावे, असा सल्ला दिला आहे.

विरोधकांचे दावे नकारात्मक!

महाराष्ट्रात सेमी कंडक्टरचा संलग्न प्रकल्प सुरू करण्याच्या  ‘फॉक्सकॉन’च्या घोषणेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. विरोधकांनी केवळ राजकीय स्वार्थासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे करून आपल्या अकार्यक्षमतेचे प्रदर्शन केले, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

वेदांतला सवलती दिल्याचे पुरावे द्या : आशीष शेलार

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने ज्या जलदगतीने विदेशी दारूला करसवलती दिल्या, त्याच जलदगतीने वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून कर सवलती दिल्याचे पुरावे द्यावेत, असे आव्हान मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष  शेलार यांनी गुरुवारी विरोधकांना दिले. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना मराठीजनांना थापा मारून भ्रम आणि गुजराती माणसाबद्दल शत्रुत्व निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप आमदार शेलार यांनी केला. फॉक्सकॉनकडून दोन वर्षे चर्चा सुरू होती, असे कंपनीकडून सांगण्यात आले असून तरीही सामंजस्य करार झाला नाही, यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी वाटमारी किंवा कमिशन मागितल्याचा संशय येतो, असे शेलार यांनी नमूद केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button