breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महानगरपालिकेच्या वतीने क्लोरीन वायू गळती ‘मॉक ड्रिल’

प्रशासनाचा सराव : आपत्कालीन व्यवस्थापनासाठी सतर्कता

पिंपरी | शहरातील औद्योगिक आस्थापनांनी सुरक्षेला प्राधान्य देऊन घातक रासायनिक पदार्थांची हाताळणी करताना किंवा वाहतूक करताना आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वतीनेही याबाबत विशेष काळजी घेतली जात असून भविष्यात अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडल्यास तिच्यावर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी शहरातील आपत्कालीन व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणांशी समन्वय साधून शहरातील विविध औद्योगिक क्षेत्रांच्या ठिकाणी मॉक ड्रिलचे आयोजन केले जाईल जेणेकरून जिवीत आणि पर्यावरण हानी होण्यापासून बचाव केला जाऊ शकतो, असे प्रदीप जांभळे पाटील म्हणाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज निगडी येथील सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्र येथे क्लोरीन वायुगळती नियंत्रण या विषयावरील आपत्कालीन सरावाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील बोलत होते. या सरावावेळी महापालिका, एनडीआरएफ, पोलीस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्यगिक सुरक्षा संचलनालय यांचा सहभाग होता. या मॉक ड्रीलवेळी महापालिकेचे सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, उपआयुक्त मनोज लोणकर, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, चीफ केमिस्ट प्रशांत जगताप, कार्यकारी अभियंता डॉ. रवी तुपसाखरे, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम तसेच एनडीआरएफचे सेकंड इन कमांडंट रविप्रकाश, दिपक तिवारी, सहाय्यक कमांडंट प्रविण धट, पोलीस निरीक्षक अजयकुमार यादव, ईश्वरदास मते, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल टारपे, सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. डी. चौधरी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुनंदा जाधव, औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे सहाय्यक संचालक संजय गिरी, पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, दंगल नियंत्रण पथकाचे प्रमुख संदीप देशमुख, महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी ऋषिकांत चिपाडे, गौतम इंगवले तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये क्लोरीनचा वापर जलशुद्धीकरणासाठी केला जातो. याकरिता याठिकाणी क्लोरीनचे सिलेंडर ठेवलेले असतात. कोणत्याही ठिकाणी रासायनिक विषारी वायुगळती झाल्यास ती दुर्घटना कशा पद्धतीने हाताळावी यासाठी महापालिकेच्या पुढाकाराने सेक्टर क्र. २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात आपत्कालीन सराव घेण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत हाताळणाऱ्या संलग्न यंत्रणांमध्ये समन्वय राहावा यासाठी हा सराव उपयुक्त ठरणार आहे, असे आपत्कालीन विभागाचे सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर म्हणाले.

हेही वाचा   –    ‘भरत गोगावलेंचाच व्हीप ठाकरे गटाला लागू होणार’; राहुल नार्वेकरांचं मोठं विधान 

वायुगळतीबाबत जनजागृतीची गरज : अजयकुमार यादव

एनडीआरएफचे पोलीस निरीक्षक अजयकुमार यादव विषारी वायुगळती रोखण्याबद्दल माहिती सांगताना म्हणाले, क्लोरीन हा अतिशय घातक वायू आहे. हा हवेपेक्षा जड वायू असल्यामुळे शक्यतो तो जमिनीवरच पसरतो. नागरिकांनाही याबाबत अवगत करणे गरजेचे असून ज्या भागात क्लोरीनचा वापर केला जातो त्या भागातील नागरिकांमध्ये वायुगळतीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. वायुगळती होऊ नये यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांची वारंवार तपासणी करणे गरजेचे आहे. क्लोरीनचा वापर करणाऱ्या व्यक्तीला क्लोरीनच्या सर्व गुणधर्मांबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

द्रव्य स्वरूपातील क्लोरीन हा आणखी घातक असून हवेच्या संपर्कात आल्यानंतर तो चार पटीने वाढतो. वायुगळती झाल्यास महापालिकेने शहरातील सर्व आपत्कालीन यंत्रणांसोबत समन्वय साधणे गरजेचे आहे. यासोबतच वायुगळतीबाबत नागरिकांमध्ये अफवाही पसरतात, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. अशा घटनांबाबत समाज माध्यमातूनही जनजागृती झाली पाहिजे. प्रत्यक्ष ठिकाणी आणि अप्रत्यक्ष ठिकाणी वायुगळतीबाबत वेगवेगळा कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. तसेच साहित्य सुरक्षितता माहिती पत्रक बनविणे खूप गरजेचे आहे. ज्यामध्ये कोणत्याही प्रशासकीय किंवा औद्योगिक ठिकाणी वापरात येणाऱ्या घातक रासायनिक घटकांची संपूर्ण माहिती नमूद असायला हवी. त्यामध्ये वापरात येणाऱ्या रासायनिक घटकाचे गुणधर्म, वायुगळती झाल्यास बाळगायची सावधगिरी, नियंत्रणाचे उपाय आणि रासायनिक घटकांमुळे आरोग्यावर होणारे परिणाम असे सर्व घटक असायला हवेत, असे अजयकुमार यादव यावेळी म्हणाले.

..अन्‌ वायुगळती रोखली!

आपत्कालीन सरावाच्या सुरूवातीस महानगरपालिकेच्या निगडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सिलींडरमधून क्लोरीन वायुची गळती झाल्याची वर्दी जलशुद्धीकरण केंद्रातील अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागास तसेच अग्निशमन विभागास दिली. वर्दी मिळताच तात्काळ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती कक्षाकडून वैद्यकीय विभाग, पोलीस यंत्रणा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा संचलनालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देखील संदेश देण्यात आला. त्यानंतर २ रुग्णवाहिका आणि पोलीस दल घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी वायुगळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु परिस्थिती आटोक्यात येत नसल्याचे पाहून एनडीआरएफ दलाला पाचारण करण्यात आले. एनडीआरएफ दलाच्या जवानांनी दाखल होताच बचावकार्याची प्रक्रिया सुरू केली.

क्लोरीन वायुगळतीमुळे बाधित झालेल्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. हवेची दिशा पाहून वायुगळती रोखण्याचे कार्य एनडीआरएफने सुरू केले. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी अत्याधुनिक उपकरणे आणि साहित्यांच्या मदतीने यशस्वीरित्या वायुगळती रोखली. यामध्ये त्यांना महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनीही सहकार्य केले. या आपत्कालीन सरावामध्ये एनडीआरएफ दलाचे ५१ जवान, महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाचे २९ जवान, पोलीस दलाचे २२ जवान, दंगल नियंत्रण पथकाचे २० जवान, सुरक्षा विभागाचे ११ सुरक्षारक्षक तसेच वैद्यकीय विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button