breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा यशस्वी

जागतिक आर्थिक परिषदेत ३ लाख ५३ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

मुंबई : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला असून यावर्षी ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार स्वाक्षरीत झाले. त्याचप्रमाणे, जवळपास एक ते दीड लाख कोटी रुपयांचे आणखी सामंजस्य करार स्वाक्षांकित होण्यासाठी परदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखविले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितले.

जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य व केंद्र शासनाचे शिष्टमंडळ दावोस येथे गेले होते. तेथून परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया या देशांतील गुंतवणूकदारांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून यूएई, ओमान या देशांतील गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शविली आहे.  त्याचबरोबर आर्सेलर मित्तल, जिंदाल, गोदरेज, अदानी या उद्योगसमूहांनीसुद्धा महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दावोस दौरा यशस्वी झाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा  – प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशातील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी; केंद्र सरकारचा निर्णय

मागील वर्षी दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारांपैकी ७५ ते ८० टक्के करार कागदावर न राहता प्रत्यक्षात आले. या करारामुळे २ लाखांपेक्षा जास्तीचे रोजगार निर्माण होणार आहेत. जेम्स आणि ज्वेलरी, माहिती तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, हरित ऊर्जा, पेपर आणि पल्प, अशा अनेक उद्योजकांनी तसेच डेटा सेंटर,  इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये गुंतवणुकीला पसंती दर्शविली आहे. जेम्स आणि ज्वेलरी उद्योगात १ लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारला केंद्राची भक्कम साथ असल्याने उद्योजक हे आत्मविश्वासाने, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याचे अनुभवण्यास मिळत  असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्टात पायाभूत सुविधा, दळणवळणाच्या उत्तम सुविधा, कुशल मनुष्यबळ असून महाराष्ट्रात एक इको सिस्टिम आहे. त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे व्हिजन, डॉयनॅमिक लीडरशीप, ग्लोबल लीडर म्हणून त्यांची झालेली ओळख याबाबत दावोस दौऱ्यात अनेक देशातील नागरिकांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव जगभरात असून त्यांचे नाव लोक आदराने घेतात. परदेशी गुंतवणुकीसाठी याचाही फायदा महाराष्ट्राला झाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button