Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण चर्चा मात्र उपमुख्यमंत्र्यांची; राजकीय सत्तानाट्यात देवेंद्र फडणवीस ठरले ‘किंगमेकर’

मुंबई । देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील वेगळेच रसायन. त्यांच्या मनाचा थांग लागणे कठीण. त्यांच्या मनात काय चालले आहे ते ना कधी चेहऱ्यावर येत ना ओठांवर. इतरांना कळण्याचा तर प्रश्नच नाही! याची गोष्ट त्याला सांगायची नाही की याची त्याला. कुणाला दुखवायचे नाही. कठोर शब्दांत बोलायचे नाही. एखाद्याला मदत करायची ठरवली तर ती कुठल्याही पातळीवर जाऊन करायची आणि त्याची कुठेच वाच्यता करायची नाही, हा त्यांचा गुण. त्यामुळे केवळ पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षांतील लोकही त्यांच्याशी अनेक गोष्टी विश्वासाने बोलतात. राजकीय कारकीर्दीत त्यांनी किती तरी कटू गोष्टी सहज पचविल्या असाव्यात. चेहऱ्यावर सातत्याने झळकणारे स्मित हे समोरच्यांना आपलेसे करून घेण्याचे त्यांचे प्रमुख हत्यार. त्यामुळे त्यांचे पक्षात, विरोधी पक्षातही अनेक मित्र आहेत.

एकदा लढायचे ठरले की, ते मागे हटत नाहीत. हा त्यांचा आजचा स्वभाव नाही. त्याच्या राजकीय आयुष्याचा प्रारंभ जरी बघितला तर, कॉलेज जीवनात त्यांनी पहिली टक्कर घेतली ती थेट श्रीकांत जिचकार यांच्याशी. त्यांच्या पॅनलच्या विरोधात यांनी ‘कॅरी ऑन’ पॅनल उतरविले. इथे हरलो तर संपलोच, हे ठाऊक असूनसुद्धा ते लढले. पर्वा न करता भिडणे हा त्यांचा स्थायीभाव. तो झळकतच असतो.

संघर्ष आणि संयम हे त्यांचे दोन मित्र. नशीब अधूनमधून त्यांच्या सोबतीला असते. राजकारणातील त्यांच्या प्रवेशासाठी नशीबच धावून आले. महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी वयाची २१ वर्षे पूर्ण असावीत अशी अट होती. १९८९मध्ये नागपुरात महापालिकेची निवडणूक होणार होती. तेव्हा फडणवीसांचे वय होते फक्त १९. आपण निवडणूक लढू शकणार नाही ही जाणीव त्यांना अस्वस्थ करीत होती. करावे तर काय? त्यांचे नशीब खूपच बलवत्तर होते. निवडणूक पुढे ढकलली गेली आणि ती १९९२मध्ये झाली. तेव्हा त्यांनी वयाची २१ वर्षे नुकतीच पूर्ण केली होती. नियतीने जणू याच्यासाठीच निवडणुकीस उशीर केला असावा. ते लढले, नगरसेवक झाले तेथून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती आजही सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस हे नाव पहिल्यांदा महाराष्ट्राच्या कानावर पडले ते तरुण महापौर अशी ओळख घेऊन. त्यानंतर १९९९मध्ये ते आमदार झाले. सांसदीय आयुधांचा अचूक वापर करीत त्यांनी सरकारला वेळोवेळी सळो की पळो करून सोडले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या असोत, कुपोषण असो, तेलगी कांड, मुंबईवरील हल्ला, आदर्श घोटाळा, सिंचन घोटाळा यावर विधिमंडळात जो आवाज घुमला तो फडणवीसांचा होता. उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट आमदार, वक्ता, अभ्यासू नेता ही त्यांची कमाई. २०१४मध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग असे उपक्रम राबवत छाप उमटवली. २०१९मध्ये भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आक्रमकतेने सांभाळली.

राज्यसभेची निवडणूक असो की विधान परिषदेची, त्यात भाजपच्या उमेदवारांना निवडून आणत त्यांनी आपल्या संघटन कौशल्याची, विरोधी पक्षात असलेल्या संबधांची चुणूक दाखवली होती. बिहार असो की गोवा त्या राज्यात भाजपच्या विजयात त्यांचे डावपेच यशस्वी ठरले.

महाविकास आघाडीतील अस्वस्थता, एक विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी अचूक ओळखली. शिवसेनेच्या बंडखोरांना सोबत घेऊन सत्तेची गणिते जमवली. एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करताना, सामान्य शिवसैनिकास मुख्यमंत्री केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ‘या सत्तेत मी कुठेही नसणार नाही’, असे सांगून वेगळे होण्याचा प्रयत्न केला. पक्षश्रेष्ठीने ‘तुम्हाला सरकारमध्ये राहावे लागेल’, असे सांगितले तेव्हा एक यशस्वी मुख्यमंत्री आपल्याच सहकाऱ्याच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास तयार झाला. प्रयत्न, परिश्रम, संयम, शिस्त यांच्या जोरावर ते उपमुख्यमंत्री म्हणून आपली मोहोर उमटवतील हे नक्की.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button