breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

विश्वासघात, फसवणूक आणि कॉपीराईट नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंगनाविरोधात गुन्हा दाखल

मुंबई – अभिनेत्री कंगना राणौैत हिच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. आता कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेलविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विश्वासघात करणे, फसवणूक करणे आणि कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करणे आदी आरोपांखाली चौैघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगना आणि रंगोलीसोबतच या प्रकरणामध्ये कुमार जैन आणि अक्षय रणौत या दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

खार पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक असणाऱ्या गजानन काब्दुले यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिलीय. आम्ही कंगना आणि इतर चार जणांविरोधात न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. येत्या काही दिवसांमध्ये या प्रकरणाच्या तपासासाठी कंगनाला पोलीस ठाण्यामध्ये बोलावण्यात येणार असल्याचेही समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिद्दा द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीरचे लेखक आशीष कौल यांनी आपल्या पुस्तकाची कथा काही दिवसांपूर्वी कंगनाला ईमेलवरुन पाठवली होती. त्यानंतर काही दिवसांनी याच कथेवर आधारित चित्रपटाची घोषणा कंगनाने ट्विटरवरुन केली. मात्र ही घोषणा करण्याआधी कंगाने या कथेचे मूळ लेखक असणाऱ्या कौल यांची परवानगी घेतली नव्हती.

समोर आलेल्या माहितीनुसार कंगनाने याच वर्षी जानेवारी महिन्यात या चित्रपटासंदर्भातील घोषणा केली होती. त्यानंतर कौल यांनी वांद्रे येथील महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांनी कंगनाबरोबरच तिची बहीण रंगोली, कमल कुमार जैन आणि अक्षय रणौत या तिघांच्या नावांचाही उल्लेख आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने सर्व गोष्टीची पडताळणी करुन मुंबई पोलिसांना या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी आयपीसी ४०६,४१५,४१८,३४,१२०(ब) आणि कॉपीराइट कायद्याअंतर्गत ५१,६३ आणि ६६ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात लवकरच चौघांविरोधात समन्स काढून त्यांना चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलवण्यात येईल.

मुंबईमधील वांद्रे पोलीस स्थानकामध्ये कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात सोशल नेटवर्किंगवरुन समाजामध्ये द्वेष निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातही वांद्रे न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button