TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

कंत्राटदाराकडून वाहनतळांवर शुल्कवसुली बंद; मुंबईतील १३ ठिकाणी मोफत वाहने उभी करण्याची संधी

मुंबई : खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशा परिस्थितीमुळे महापालिकेच्या दक्षिण मुंबईतील नऊ वाहनतळांवरील शुल्कवसुलीला कंत्राटदाराने सोडचिठ्ठी दिली आहे. तर, अन्य चार ठिकाणच्या वाहनतळांच्या कराराचा कालावधी संपुष्टात आला आहे. परिणामी, नव्या कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत मुंबईकरांना या १३ सार्वजनिक वाहनतळांवर विनाशुल्क वाहने उभी करता येणार आहेत. दरम्यान, या वाहनतळांवर बेकायदा शुल्कवसुली होऊ नये यासाठी तेथे फलक लावण्यात आले असून लवकरच भरारी पथकेही तैनात करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे.

मुंबई महापालिकेच्या ए विभाग कार्यालयाच्या हद्दीतील नरिमन पॉइंट, चर्चगेट, कुलाबा, कफ परेड या परिसरातील काही निवडक रस्त्यांवर वा सशुल्क सार्वजनिक वाहनतळे सुरू केली. या वाहनतळांवर शुल्क वसूल करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदारांची नियुक्ती करण्यास सुरुवात झाली होती.

विधान भवन, ग्रीन स्ट्रीट, पी. एन. रोड, एनसीपीए मार्ग, जे. टी. सिपाही मलानी मार्ग, के. दुभाष मार्ग, हुतात्मा चौक ३, हुतात्मा चौक ४ या नऊ वाहनतळांवरील शुल्क वसुलीचे काम निविदा प्रक्रिया राबवून मंगलमूर्ती एन्टरप्रायझेस कंपनीला देण्यात आले होते. करोनाकाळात टाळेबंदी लागू होताच मुंबईतील कारभार ठप्प झाला होता. त्यानंतर कडक निर्बंध लागू करण्यात आले. तेव्हाही फारशी वाहने या भागात येत नव्हती. त्यामुळे वाहनतळांवरील शुल्कवसुलीत कमालीची घट झाली होती. करोनाविषयक सर्व निर्बंध हटविण्यात आल्यानंतर या वाहनतळांवरील शुल्कवसुलीत वाढ होईल अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरल्यामुळे कंत्राटदाराने शुल्कवसुलीचे काम बंद केले. त्यामुळे ही वाहनतळे आता महापालिकेच्या ताब्यात आली आहेत. त्याचबरोबर बाबुभाई चिनॉय, आयएमसीए रोड, अदी मर्झबान मार्ग, बॉम्बे हॉस्पिटल लेन या चार ठिकाणच्या सार्वजनिक वाहनतळांचे कंत्राट देण्यात आले होते. या कंत्राटाची मुदत संपुष्टात आली आहे. परिणामी, या सर्व वाहनतळांवर नागरिकांना विनाशुल्क वाहने उभी करता येणार आहेत.

या ठिकाणी बेकायदा शुल्कवसुली होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सावध करण्यासाठी महापालिकेने वाहनतळांवर सूचना फलक लावले आहेत. या वाहनतळांवर लवकरात लवकर कंत्राटदाराची नियुक्ती करावी, असे ए विभाग कार्यालयाने मुंबई  महापालिकेच्या वाहतूक विभागाला कळविले आहे. मात्र, कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत तेथे विनाशुल्क वाहन उभे करता येईल, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कंत्राट कालावधी संपल्याने, तसेच कंत्राटदाराने शुल्कवसुलीचे काम बंद केल्यामुळे काही सार्वजनिक वाहनतळांवर नागरिकांना विनाशुल्क वाहने उभी करता येतील. बेकायदा शुल्क घेत असल्याचे आढळताच पोलिसात तक्रार दाखल करावी.

– शिवदास गुरव, साहाय्यक आयुक्त, ए विभाग

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button