ताज्या घडामोडीमुंबई

राज ठाकरे यांना केंद्राची सुरक्षा?; भाजप- मनसे मनोमिलन अधिक घट्ट होण्याची शक्यता

 मुंबई | प्रतिनिधी

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लवकरच केंद्र सरकारतर्फे सुरक्षा पुरविण्यात येऊ शकते, अशी चर्चा मनसेच्याच वरिष्ठ वर्तुळात सुरू आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला ७ फेब्रुवारी रोजी पत्र लिहून राज यांना सुरक्षा पुरविण्याच्या विषयाकडे लक्ष वेधले होते. मात्र या पत्राकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यानंतर केंद्र सरकारकडे मनसे नेतृत्वाचे डोळे लागले आहेत. या सुरक्षेच्या माध्यमातून भाजप-मनसे मनोमिलन अधिक घट्ट होण्याची शक्यता मनसे नेतृत्वाकडून वर्तवण्यात येत आहे.

‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काही संघटनांकडून धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवावी आणि त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी आम्ही ७ फेब्रुवारी केली होती. याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याने पुन्हा आम्ही राज्य सरकारला पत्र लिहिणार आहोत. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांनादेखील सुरक्षा पुरवावी, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे पुन्हा एकदा करणार आहोत. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनादेखील पत्र लिहिणार आहोत,’ अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.

अयोध्या दौऱ्यासाठी मनसेची तयारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये या भूमिकेचा योग्य प्रचार व्हावा, तसेच आगामी मुंबई महापालिका आणि इतर पालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून या दौऱ्याचा फायदा व्हावा, यासाठी मनसेने तयारी सुरू केली आहे. या दौऱ्याची रूपरेषा आखण्यासाठी राज यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज, मंगळवारी विशेष बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत मनसेचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अयोध्येच्या दौऱ्यावरून विरोधकांनी राज यांना लक्ष्य केले आहे.

अयोध्येत गेल्याने महागाई कमी होणार का?

कोणी अयोध्येत गेले काय किंवा राम मंदिरात, सर्वसामान्यांच्या जीवनातील महागाईचे चटके कमी होणार का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी केला. ‘महागाईवरून नागरिकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी वादाचे विषय उकरून काढले जात आहेत. या जाळ्यात आम्हाला अडकायचे नाही. आम्ही फक्त महागाईवर बोलणार,’ असे आव्हाड म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

काँग्रेसचीही टीका

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर काँग्रेसनेही टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच राज यांनी अयोध्या दौऱ्यावरून भाजप आणि विश्व हिंदू परिषदेवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली होती. हेच व्यंगचित्र काँग्रेसकडून पुन्हा प्रसिद्ध करण्यात आले आणि त्यावर हे व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे हेच का दुसरे कोणी, असा प्रश्न काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

राणे यांचे समर्थन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंबंधी घेतलेल्या भूमिकेला माझे समर्थन आहे. राज ठाकरे कायदेशीर बोलले असून राज्य सरकारला यासंदर्भात पावले उचलावी लागतील, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मांडली. त्याचवेळी राज यांची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तुलना करू इच्छित नाही, असेही राणे यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

पोलखोलची काय अपेक्षा?

जे स्वतः उघडे पडले आहेत, त्यांच्याकडून पोलखोलची काय अपेक्षा करायची, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता लगावला. राज यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी भोंग्यांच्या विषयावर त्यांना विचारले असता, आता विनाकारण दळण दळत बसू नका, असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button