TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवड

संप काळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने दिल्या जाणा-या आपत्कालीन सेवा बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावीः शेखर सिंह

पिंपरी : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यव्यापी बेमुदत संप सुरु असून या संपकाळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिल्या जाणा-या आपत्कालीन सेवा कोणत्याही परिस्थितीत बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी आज महापालिका प्रशासनाला दिले.

जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सुरु असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा प्रभावित झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनाबाबत चर्चा करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत अत्यावश्यक सेवा कामकाजाचा आयुक्त सिंह यांनी आढावा घेऊन विविध सूचना केल्या, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह वैद्यकिय, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, आरोग्य, विद्युत, अग्निशमन, सुरक्षा आणि पर्यावरण विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यामध्ये सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, संजय कुलकर्णी, संजय खाबडे, श्रीकांत सवणे, उप आयुक्त विठ्ठल जोशी, अजय चारठाणकर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहायक आयुक्त विजयकुमार थोरात, वामन नेमाने, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच विविध विभागांचे कार्यकारी अभियंता आणि अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील काही अधिकारी व कर्मचारी यांनी या राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये सहभाग घेतला असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने आयुक्त शेखर सिंह याच्या स्वाक्षरीचे स्वतंत्र परिपत्रक निर्गमित केले आहे. दिनांक १४ मार्च २०२३ पासून शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचा-यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारलेला आहे. संपामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत हा संप असूनही नविन पेन्शन योजना लागू असलेले व जुनी पेन्शन योजना लागू असलेले असे सर्वच अधिकारी व कर्मचारी या संपात सहभागी असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

वास्तविक पाहता जुनी पेन्शन योजना अनुज्ञेय असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांनी या संपात सहभागी होण्याचे कुठलेही प्रयोजन नाही. महानगरपालिका अधिकारी व कर्मचा-यांनी संपामध्ये सहभागी होऊ नये याबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने सूचना निर्गमित करुनही पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांनी राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे महानगरपालिके समोरील प्रशासकीय आव्हाने विचारात घेवून पुर्वनियोजीत उद्दीष्ट्ये पुर्ण करणे, अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु ठेवणे, समाज उपयोगी विकास कामे निर्धारित मुदतीत पुर्ण करणे यामध्ये बाधा निर्माण होवून शहरातील नागरिकांना वेठीस धरले गेले आहे, असे या परिपत्रकात नमूद केले आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये जे अधिकारी व कर्मचारी दिनांक १ नोव्हेंबर, २००५ पुर्वी महानगरपालिका सेवेत रुजू झालेले (जुनी पेन्शन योजना अनुज्ञेय असेलेले) आहेत, अशा अधिकारी व कर्मचा-यांनी तात्काळ कर्तव्यावर रुजू व्हावे. संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या आस्थापनेवर कार्यरत जुन्या पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना तात्काळ कर्तव्यावर रुजू होण्याबाबत निर्देश द्यावेत. तशा सूचना लेखी स्वरूपात संबंधितांना देण्यात याव्यात, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. या निर्देशांचे पालन न झाल्यास तसेच असे अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर तात्काळ रुजू न झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम क्रमांक ६ चा भंग केल्याने शिस्त भंग कारवाईस पात्र राहतील अशी समज या परिपत्रकान्वये सर्व संबंधितांना देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button