“आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातून…”; एलॉन मस्क यांच्या ‘त्या’ ट्विटला जयंत पाटील यांचे उत्तर
![“आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातून…”; एलॉन मस्क यांच्या ‘त्या’ ट्विटला जयंत पाटील यांचे उत्तर](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/jayant-patil.jpg)
मुंबई |
अमेरिकेची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाच्या भारतीय बाजारपेठेत प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एलॉन मस्क यांनी अलीकडेच भारतात टेस्ला लॉन्च करताना भारत सरकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले होते. गुरुवारी, टेस्लाचे उत्पादन भारतात आणण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर एलॉन मस्क यांनी त्यांना सध्या सरकारी पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत उत्पादनाच्या लॉन्चिंगची वेळ सांगू शकत नाही, असे म्हटले होते. इलॉन मस्क यांच्या वक्तव्यानंतर काही तासांनी आता भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली होती. भारतातील उत्पादनास वचनबद्ध केल्याशिवाय टेस्ला शुल्क कपातीची मागणी करू शकत नाही, असे भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता देशातील विविध राज्यांनीही मस्क यांना प्लांट उभारण्यासाठी आमंत्रित केले आहे. दरम्यान, तेलंगणाच्या एका मंत्र्याने मस्क यांना राज्यात प्लांट उभारण्यासाठी आमंत्रित केल्यानंतर महाराष्ट्रातल्याही मंत्र्यांने अशीच गळ घातली आहे.
एलॉन मस्क यांच्या त्या ट्विटला राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. “महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे. भारतात तुमची कंपनी स्थापन करण्यासाठी आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातून आवश्यक ते सर्व सहकार्य देऊ. आम्ही तुम्हाला तुमचा उत्पादन कारखाना महाराष्ट्रात स्थापित करण्यासाठी आमंत्रित करतो,” असे उत्तर जयंत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून दिले आहे.
.@elonmusk, Maharashtra is one of the most progressive states in India. We will provide you all the necessary help from Maharashtra for you to get established in India. We invite you to establish your manufacturing plant in Maharashtra. https://t.co/w8sSZTpUpb
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 16, 2022
याआधी तेलंगणाचे उद्योग आणि अर्थ मंत्री केटी रामाराव यांनी इलॉन मस्कच्या ट्विटला उत्तर दिले होते. “अॅलन, मी भारतातील तेलंगणा राज्याचा उद्योग मंत्री आहे. भारत/तेलंगणामध्ये प्लांट स्थापन करण्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यास आनंद होईल. आमचे राज्य अनेक शाश्वत उपक्रमांमध्ये चॅम्पियन आहे आणि भारतातील एक उत्तम व्यावसायिक गंतव्यस्थान आहे,” असे रामाराव यांनी म्हटले आहे.
Hey Elon, I am the Industry & Commerce Minister of Telangana state in India
Will be happy to partner Tesla in working through the challenges to set shop in India/Telangana
Our state is a champion in sustainability initiatives & a top notch business destination in India https://t.co/hVpMZyjEIr
— KTR (@KTRTRS) January 14, 2022
तत्पूर्वी, एलॉन मस्कने भारतात उत्पादन लाँच करण्यासाठी त्यांना सरकारी पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे, असे म्हटले होते. भारतात आपली उत्पादने लॉन्च करण्याच्या कंपनीच्या योजनांबद्दल केलेल्या ट्विटला उत्तर देताना, मस्क यांनी, “सरकारी स्तरावर अजूनही अनेक आव्हाने आहेत,” असे म्हटले होते. टेस्ला भारतात येण्याआधी आयात शुल्कात कपात करण्याची मागणी करत आहे. त्याचबरोबर आयात शुल्कात सवलत देण्याबाबत सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. एलॉन मस्क २०१९ पासून भारतात आपल्या कार लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेतील दिग्गज इलेक्ट्रिक वाहन कंपनी आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेली चर्चा भारतात कारखाना सुरू करणे आणि आयात शुल्कात कपात करण्याच्या मुद्द्यावर अडकले आहे. यावर कोणत्याही परदेशी ऑटोमोबाईल कंपनीला अशा सवलती न दिल्याने आणि टेस्लाला आयात-शुल्क लाभ न दिल्याने भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणाऱ्या अन्य वाहन कंपन्यांना चांगला संदेश जाणार नाही, असे सरकारने म्हटले आहे.