रिझर्व बँकेचा केंद्राला विक्रमी 2.69 लाख कोटींचा लाभांश

मुंबई : रिझर्व बँकेने केंद्र सरकारला विक्रमी लाभांश जाहीर केला आहे. रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार 2024 – 25 साठी केंद्र सरकारला बँकेच्या संचालक मंडळाने 2.69 लाख कोटी रुपयाचा लाभांश देण्याचे निश्चित केले आहे. 2023-24 मध्ये रिझर्व बँकेने केंद्र सरकारला दिलेल्या लाभांशापेक्षा यावर्षी दिलेला लाभांश तब्बल 27.4 टक्क्यांनी जास्त आहे.
2023-24 मध्ये रिझर्व बँकेने केंद्र सरकारला लाभांशापोटी 2.1 लाख कोटी रुपयाची रक्कम दिली होती. तर 2022 -23 मध्ये ही रक्कम 87, 416 कोटी रुपये इतकी होती. रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या केंद्रीय संचालक कांची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत रिझर्व बँकेच्या संचालक मंडळाने देशातील आणि प्रदेशातील बदलणार्या आर्थिक घडामोडीचा आढावा घेतला.
हेही वाचा – राज ठाकरेंचं वक्तव्य; “ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, पण मी लिहून देतो…”
अर्थव्यवस्थे समोर येणारे अडथळे आणि त्यावरील शक्य उपाययोजनावर या बैठकीत चर्चा झाली असल्याचे रिझर्व बँकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. या बैठकीत रिझर्व बँकेच्या सरलेल्या वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेऊन ताळेबंदाला मंजुरी देण्यात आली.
या अगोदर संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये रिझर्व बँकेने किती प्रमाणात राखीव निधी ठेवायचा या संदर्भात चर्चा केली होती. मार्गदर्शक तत्त्वानुसार रिझर्व बँक आपल्या एकूण उत्पन्नापैकी 7.50 ते 4.50% पर्यंतची रक्कम एकूण परिस्थिती पाहून राखीव म्हणून ठेवू शकते. देशातील आणि परदेशातील जोखीमेचा आढावा घेऊन रिझर्व बँकेने यावर्षी एकूण उत्पन्नातील 7.50% रक्कम राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उरलेली रक्कम केंद्र सरकारला लाभांश म्हणून देण्याचे ठरविले आहे.