आता एटीएममधून पैसे काढणे महागणार
![Now it will be more expensive to withdraw money from ATMs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/ATM-.jpg)
मुंबई – सध्या कोरोनाच्या काळात अनेकजण आर्थिकदृष्ट्या चिंतेत असताना आता एटीएममधून पैसे काढणाऱ्या लोकांनाही मोठा दणका बसणार आहे. आता आपलेच पैसे एटीएममधून काढणे अधिक महागणार आहे. बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक पैसे एटीएममधून काढल्यानंतर बँका शुल्क आकारणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना एटीएमवर अशा प्रत्येक व्यवहारावरील शुल्कात २१ रुपये कपात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता एटीएम वापरताना जपून वापरावे लागणार आहे.
हे सुधारीत दर १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत. ग्राहक बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला पाच वेळा विनामूल्य व्यवहार करू शकतात. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहाराला शुल्क आकारले जाणार आहे. तर डेबिट-क्रेडिट कार्ड्सद्वारे पेमेंट प्रकिया करणाऱ्यांवरही बँका अधिक फी घेणार असल्याचे समजते. रिझर्व्ह बँकेने नुकतीच मास्टरकार्डवर बंदी घातली आहे. यानंतर हे कार्ड चर्चेचा विषय बनले आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसा हे दोघेही भारतातील पेमेंटसाठीचे सर्वात मोठे स्त्रोत मानले जातात. जेव्हा जेव्हा एखादा ग्राहक हे कार्ड वापरतो, तेव्हा त्याची संपूर्ण माहिती त्या कंपनीच्या सर्व्हरवर जाते. या कंपन्यांचे सर्व्हर परदेशात आहेत. जिथे माहितीची प्रक्रिया आणि व्हेरिफिकेशन केले जाते. ज्या बँका या कार्डच्या सेवा वापरतात त्या प्रत्येक ३ महिन्यानंतर फी भरतात. बँक बझारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कार्डवरील प्रत्येक व्यवहारासाठी एक इंटरचेंज फी आकारली जाते. व्यवहारासाठी ही रक्कम फारच कमी आहे.