देशातील तीन विमानतळे खासगी कंपन्यांना भाडेतत्वावर देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Capture-65.jpg)
केंद्र सरकारने खासगीकरणाची मोहीम सुरू केली असून चार सरकारी बँकांच्या खासगीकरणानंतर आता देशातील तीन विमानतळे भाडेतत्वावर खासगी कंपन्यांना देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सरकारी निर्गुंतवणुकीचे धोरणही केंद्र सरकार जोरदारपणे राबवत आहे. देशातील चार सरकारी क्षेत्रातील बँका पंजाब अॅण्ड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक व आयडीबीआय बँक यांच्या खासगीकरणाच्या निर्णयानंतर आता देशातील तीन विमानतळ भाडेतत्वावर खासगी कंपन्यांना देण्यास केंद्रातील मोदी सरकारने परवानगी दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीनंतर मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबद्दलची माहिती दिली. सरकारने एअरपोर्ट्स अथॉरेटी ऑफ इंडियाकडे असलेल्या जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपूरम ही तीन विमानतळे भाडेतत्वावर देण्यास मोदी सरकारने मंजूरी दिली आहे.
सरकारने ही मंजूरी पब्लिक आणि प्रायव्हेट पार्टनरशिप नुसार दिली आहे. याचा अर्थ जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपूरम ही तिनही विमानतळे खासगी कंपन्यांच्या हातात जातील. अर्थात मोदी सरकार अशा प्रकारचा निर्णय घेणार असल्याचा अंदाज याआधीच व्यक्त केला जात होता. पण किती आणि कोणती विमानतळे दिली जातील याबद्दलची माहिती आज देण्यात आली.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे फायदे देखील जावडेकर यांनी सांगितले. यामुळे सरकारला १ हजार ७० कोटी रुपये मिळणार आहेत. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया याद्वारे अन्य छोट्या शहरात विमानतळाची निर्मिती करू शकेल. याचा दुसरा फायदा असा की प्रवाशांना अधिक चांगली सुविधा मिळेल.
एअरपोर्ट अथॉरेटी ऑफ इंडियाने ५० वर्षाच्या भाडेतत्वावर वरील तिनही विमानतळे खासगी कंपन्यांना दिली आहेत. त्यानंतर त्यांचा ताबा पुन्हा मिळणार आहे.