“ज्यांना दुसऱ्या राज्यात कामाला जायचं असेल, त्यांनी सरकारची परवानगी घ्यायला हवी”
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Migrant-Workers.jpg)
जे कामगार कामासाठी दुसऱ्या राज्यात जातात, त्यांनी यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी,” असं आवाहन झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलं आहे. परराज्यात काम करणाऱ्या कामगारांची माहिती राज्य सरकारकडे असायला हवी, जेणेकरून अशा कामगारांना काही त्रास झाला तर सरकार मदत करू शकेल. यासंदर्भात राज्य सरकार आदेश काढणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
करोनामुळे देशाभरात लॉकडाउन झाल्यानं विविध ठिकाणी मजूर अडकून पडले होते. राज्यांच्या तसेच जिल्ह्यांच्या सीमा प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. दुसरीकडे रोजगार बंद झाल्यानं कामगारांनी घराकडे स्थलांतर सुरू केलं. मागील दीड महिन्यापासून हा प्रश्न चर्चेत आहे. स्थलातरित कामगारांच्या प्रश्नावरून महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या राज्यात शाब्दिक चकमकही झाली होती. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवर झारखंड सरकार पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.
परराज्यात कामानिमित्त जाणाऱ्या कामगारांनी राज्य सरकारची परवानगी घेण्याचं आवाहन झारखंड सरकारनं केलं आहे. याविषयी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले,”परराज्यात कामानिमित्त जाणाऱ्या कामगारांनी बाहेर जाण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी. दुसऱ्या राज्यात असलेल्या कामगारांना काही समस्या आल्या अथवा प्रश्न निर्माण झाले, तर त्यांची मदत करण्यासाठी सरकारकडे ही माहिती असायला हवी,” असं सोरेन म्हणाले.
कामगारांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार आदेश जारी करणार आहे. विशेषतः परराज्यात काम करणाऱ्या महिलांचं शोषण होतं, असंही म्हणाले. “परराज्यात काम करताना कामगाराचं शोषण व्हायला नको. त्यामुळे परराज्यात काम करणाऱ्या कामगारांना पूर्ण सुरक्षा देण्यासाठी राज्य सरकार एक सुविधा देण्याची पद्धत सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला आहे की, जर कुणीही कामानिमित्त दुसऱ्या राज्यात जाणार असेल, तर त्यांनी राज्य सरकारची परवानगी घ्यावी,” असं सोरेन यांनी सांगितलं.