ताज्या घडामोडीविदर्भ

बुलढाण्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा

पावसाअभावी जिल्ह्यात हाहाकार उडण्याची शक्यता

बुलढाणा : मे महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झळा आहेत. २८३ गावांतील पावणेदोन लाखांवर ग्रामस्थांना आपली तहान भागविण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. पाऊस वेळेवर आला नाही तर जिल्ह्यात हाहाकार उडण्याची साधार शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील १३ पैकी ८ तालुक्यातील पाणीटंचाईची स्थिती बिकट आहे. टँकरग्रस्त गावांची संख्या वेगाने वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ६३ गावांना ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. देऊळगाव राजा तालुक्यात १४ गावांना १४ टँकरद्वारे, चिखलीमध्ये १४ गावे १४ टँकर, बुलढाणा १३ गावे १४ टँकर, मेहकर ११ गावे ११ टँकर, मोताळा ६ गावे ७ टँकर, सिंदखेडराजा ३ गावे ३ टँकर आणि लोणार तालुक्यातील २ गावांना २ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ७ तालुक्यातील ६३ गावांची तहान ६५ टँकरद्वारे भागवली जात आहे. अन्य जलस्रोत उपलब्ध नसल्याने तिथे टँकर हाच पर्याय उरला आहे. तब्बल १ लाख ८४ हजार ५९८ ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. तसेच त्यांना पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करावी लागत आहे.

दुसरीकडे, अधिग्रहित विहिरींद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांच्या संख्येतही वाढ झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ८ तालुक्यातील २२० गावांना २५६ खासगी अधिग्रहित विहिरींद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मेहकर तालुक्यातील ४८ गावांसाठी ४९ विहिरी, देऊळगाव राजा २८ गावांसाठी ५२ विहिरी, शेगाव ६ गावे ६ विहिरी, मोताळा १८ गावे १८ विहिरी, चिखली ४६ गावे ५३ विहिरी, बुलढाणा २३ गावे २५ विहिरी, सिंदखेडराजा ३४ गावे ३४ विहिरी तर लोणार तालुक्यातील १७ गावासाठी १९ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील सुमारे सव्वादोनशे गावांना अधिग्रहित विहिंरीद्वारे जलपुरवठा करण्यात येत आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात २८३ गावांत पाण्याने पेट घेतल्याचे भीषण चित्र आहे.

उपाययोजनांची मंद गती
जिल्ह्याच्या पाणी टंचाई कृती आराखड्यात विविध १५७० उपाययोजना सुचविण्यात आल्या आहे. यापैकी ४५१ योजनांना मंजुरी मिळाली असून त्यातील ४१५ योजना प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. मात्र केवळ ३० योजनाच पूर्ण झाल्या आहे. यंत्रणेचा टँकर व विहिर अधिग्रहणावरच भर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे टँकरवरील आजवरचा खर्च २ कोटी ५३ लाख तर विहीर अधिग्रहणाचा खर्च १ कोटी ३१ लाख इतका झाला आहे. या दोन योजनांवरील खर्च ४ कोटी ४८ लाख रुपयांच्या घरात गेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button