‘..मात्र महाविकास आघाडीने मला डावललं’; राहुल कलाटेंची नाराजी
२०२४ ला पुन्हा निवडणुक होणार आहे
पिंपरी : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा काल निकाल जाही झाला. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांचा विजय झाला. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या नाना काटे यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीने या पराभवाचे खापर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर फोडलं आहे. यारून आता राहुल कलाटे यांनी आपलं मौन सोडलं आहे.
बंडखोर आमदार राहुल कलाटे यांनी पराभवानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीकडून मीच सक्षम उमेदवार होतो. मला उमेदवारी दिली असती तर धंगेकरांसारखा विजयी झालो असतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावलायला नको होतं अशी खंतही राहुल कलाटे यांनी बोलून दाखवली.
ही निवडणूक विकास कामांवर होईल असं वाटलं. पण प्रत्यक्षात सहानुभूती आणि प्रतिष्ठेची निवडणूक झाली. माझा पराभव असला तरी मी कुठं चुकलो याचा शोध घेत आहे. भाजपा आणि महाविकास आघाडी अशी दोन्ही पक्षांनी ताकद मोठी होती. मी जनतेच्या जीवावर ही निवडणूक लढवत होतो, असं कलाटे म्हणाले.
महाविकास आघाडीकडून मी लढण्यास तयार होतो. मीच सक्षम उमेदवार होतो. मला उमेदवारी मिळाली असते तर धंगेकरांसारखा विजयी झालो असतो. या मतदार संघात तशी अनुकूल परिस्थिती होती. मला डावलायला नको होतं. २०२४ ला पुन्हा निवडणुक होणार आहे. त्याची तयारी मी करणार आहे, असंही कलाटे म्हणाले.