#Lockdown:1 जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगला आजपासून सुरुवात
![Railways earned Rs 11,778 crore from freight in December](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/train.jpg)
नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून 200 प्रवासी ट्रेन सुरु होणार आहे. यासाठी आज म्हणजेच 21 मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून तिकीटाच्या बुकिंगला सुरुवात होणार आहे. ही तिकीटं ऑनलाईनच बुक करता येणार आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर लोक तिकीट बुक करु शकतील. या रेल्वे सेवेत जनशताब्दी ट्रेन, संपर्क क्रांती, दुरांतो एक्स्प्रेस आणि इतर नियमित प्रवासी ट्रेनचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये अनारक्षित डबे नसतील.
रेल्वे मंत्रालयाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि गृहमंत्रालयासोबत चर्चा केल्यानंतर रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करुन देशभरात 1 जूनपासून 200 रेल्वे सुरु करणार असल्याचं सांगितलं. तसंच वेळापत्रकानुसार ट्रेन सुरु होतील, असंही म्हटलं होतं.
या ट्रेनमध्ये तात्काळ आणि प्रीमियम तात्काळ तिकीटाची सुविधा नसेल. प्रवाशांची पहिली यादी ट्रेन सुरु होण्याच्या चार तास आधी आणि दुसरी यादी ट्रेन सुरु होण्याच्या दोन तास आधी तयार होईल. स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्व प्रवाशांची स्क्रीनिंग केली जाईल. कोरोनाची लक्षणं नसलेल्या प्रवाशांनाच स्टेशन आणि ट्रेनमध्ये प्रवेश करण्याची परवानगी असेल.
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार ही ट्रेन पू्र्णत: आरक्षित असेल, ज्यात एसी, नॉन एसी दोन्ही प्रकारचे डबे असतील. तर जनरल डब्यातही आरक्षित जागा असतील. रेल्वेने केवळ ऑनलाईन तिकीट बुक करण्याची परवानगी दिली आहे. 1 जूनपासून सुरु होणाऱ्या या ट्रेनसाठी प्रवाशांना 30 दिवसांचं आगाऊ बुकिंग करता येणार आहे.