#Jayshreeram: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाला सुरुवात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Capture-14.jpg)
नवी दिल्ली – अयोध्येतील ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहेत, तो रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 44 मिनिटांच्या मुहूर्तावर हे भूमिपूजन संपन्न होणार आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत अयोध्येत पोहोचले असून अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला अगदी मोजक्या लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते भूमिपूजन होईपर्यंत अयोध्येत एसपीजी (SPG) आणि एनएसजी (NSG) जवानांचा कडेकोट पहारा असणार आहे. तसेच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांचीही कसून तपासणी होणार आहे.
दरम्यान, आजच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मंचावर पाच मान्यवरांना स्थान असेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज हे मंचावर उपस्थित राहणार आहेत.