#CoronaVirus: श्रीनगरची पहिली फॅशन डिझायनर सादिया तयार करतेय कोरोना रुग्णांसाठी मास्क
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/IMG_20200331_185202.jpg)
श्रीनगर – देश आणि जगभरात आलेल्या कोरोनाच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी आता काश्मीर खोऱ्यातील पहिली फॅशन डिझायनर सादिया मुफ्ती आता मास्क तयार करते आहे. सादियाने जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या प्रमाणकांनुसार आता मास्क तयार करण्याचे काम सुरू केले आहे. सादिया व तिची टीम कोरोना संक्रमित रुग्णांसाठी व डॉक्टरांसाठी मास्क तयार करत आहे . हे मास्क तीन थराचे आहेत. ते धुवून पुन्हा वापरू शकता.
सादियाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या प्रकोपापासून बचाव करण्यासाठी मास्कची कमतरता सर्वत्र भासते आहे. काश्मीर खोऱ्यातील काही स्वयंसेवी संघटनांच्या वतीने तिच्याकडे मदत मागितली होती. त्यानंतर तिने श्रीनगरमध्ये रिसायकलिंग युनिट तयार करून कॉटन व वॉटरप्रूफ मटेरियलचा वापर करून मास्क तयार केले. तिने एका स्वयंसेवी संस्थेसाठी एक हजार मास्क तयार करून दिले आहेत. हे मास्क आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहेत. आता ती सर्वसामान्य लोकांसाठी व रुग्णांसाठी मास्क तयार करत आहे. सादियाने तयार केलेल्या मास्कला अनेक रुग्णालये व संस्थांकडून मान्यता मिळाली आहे. दरम्यान, २०१४ मध्ये आलेल्या पुरात सादियाचे खूप नुकसान झाले होते. परंतु तिने खचून न जाता, मेहनत घेतली आणि हँगर्स द क्लोसेट दुकान पुन्हा सुरू केले. ती पाकिस्तानी सूट, ड्रेस तयार करते.