#CoronaVirus:जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 50 लाखांच्या जवळ, सव्वातीन लाख मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-75-4.jpg)
मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे जवळपास 50 लाख रुग्ण झाले आहेत. बुधवारी सकाळपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 4,985,825 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या सव्वातीन लाखांजवळ गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 324,889 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 1,958,441 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 106,475 रुग्ण, तर 3,302 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 60,864 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 42,309 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,570,583 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 93,533 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 35,341 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 248,818 इतकी आहे. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,778 लोकांचा मृत्यू झालाय. 278,803 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 32,169 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 226,699 इतका आहे.