हरियाणात मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली सरकार होणार स्थापण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/manoharlal-khattar-.jpg)
- भाजप,जेजेपी आणि सात अपक्षांनी मिळून तयार होणार सरकार
नवी दिल्ली : हरियाणामध्ये भाजपाला पुर्ण बहुमत न मिळाल्याने जजपाच्या पाठिंब्याने भाजप सत्ता स्थापण करणार हे निश्चित झाले आहे. भाजपचे मनोहर लाल खट्टर पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहेत. हरियाणात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाला राज्यपाल सत्यदेव नरेन आर्य यांनी सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले असून आज, रविवारी मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप-जननायक जनता पार्टी युती सरकारचा शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून मनोहरलाल खट्टर दुसऱ्यांदा शपथ घेतील, तर जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) नेते दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण करतील. हरियाणात दहा जागा जिंकणाऱ्या चौटाला यांच्या जेजेपीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा दावा भाजपाने राज्यपालांकडे केला होता. त्यानुसार राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले, असे नियोजित मुख्यमंत्री खट्टर यांनी सांगितले. रविवारी देशभर दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना दुपारी 2.15 वाजता आमच्या सरकारचा शपथविधी सोहळा होईल, असे खट्टर म्हणाले. काही मंत्र्यांचा शपथविधी रविवारीच होईल, असेही खट्टर म्हणाले. परंतु नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
भाजपाचे , जेजेपीचे आणि सात अपक्षांनी सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केल्यानंतर त्यांनी सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले, असे खट्टर यांनी सांगितले. त्यापूर्वी खट्टर यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे आपले राजीनामे सादर केले. तथापि, राज्यपालांनी नवे सरकार स्थापन होईपर्यंत खट्टर यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले.