सौदी अरबचा कतारला लष्करी कारवाईचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/indo-saudi-arebia-0.jpg)
पॅरिस (फ्रान्स) – सौदी अरबचा कतारला लष्करी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मीडियाने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. कतारने रशियाकडून एस-400 डिफेन्स मिसाईल्स खरेदी केल्यास सौदी अरब कतारवर लष्करी कारवाई करील असा इशारा देतानाच क्षेत्रीय शांती अबाधित राखण्यासाठी फ्रान्सने या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची अणि हा व्यवहार रोखण्याची विनंती सौदी अरबने केली आहे.
सौदी अरबचे किंग सलमान यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना या संबंधात पत्र पाठवले आहे. पत्रात किंग सलमान यांनी कतार आणि रशिया यांच्यामध्ये एस-400 ही प्रगत विमानविरोधी प्रणाली खरेदी करण्याबाबत चालू असलेल्या बोलण्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. जर कतारने रशियाकडून एस-400 ही प्रणाली खरेदी केली, तर सौदी अरब लष्करी कारवाई करून ती नष्ट करण्यास सज्ज असल्याचेही किंग सलमान यांनी इमॅन्युअल मॅक्रॉन यांना लिहिले आहे.
मात्र या बाबतीत फ्रान्सच्या अध्यक्षांच्या कार्यालयाकडून वा परराष्ट्र मंत्रालयलाकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेला साथ देण्याबद्दल आणि इराणबरोबर जवळीक करण्याबद्दल सौदी अरब, बहरीन, संयुक्त अरब अमिरातीसह क्षेत्रीय शक्तीनी कतारबरोबरचे संबंध गेल्या वर्षी जून महिन्यात तोडून टाकले आहेत.