सीव्हीसीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर
सीबीआय वाद; शुक्रवारी होणार पुढील सुनावणी
नवी दिल्ली – सीबीआयमधील अंतर्गत वादाप्रकरणी केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) सर्वोच्च न्यायालयात आज सीलबंद अहवाल सादर केला. यादरम्यान अहवाल उशिराने सादर केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सीव्हीसीला फटकारले. त्यानंतर सीव्हीसी आणि सीबीआय दोन्ही संस्थांनी दिलेला अहवाल वाचनासाठी न्यायालयाने पुढील सुनावणी 16 नोव्हेंबरपर्यंत तहकुबी ठेवली आहे.
न्यायालयाने सीबीआयच्या वकिलांना अहवालातील माहिती विचारली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. के. पटनायक यांच्या मार्गदर्शनाखाली 10 नोव्हेंबर रोजी सीव्हीसी चौकशी पूर्ण करण्यात आली, अशी माहिती सॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहता यांनी सुनावणी वेळी दिली.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीव्हीसीच्या तपासात वर्मा यांच्याविरोधत कोणत्याही स्वरुपाचे ठोस पुरावे हाती लागले नाहीत. तसेच सीबीआयचे हंगामी संचालक नागेश्वर राव यांच्या निर्णयांवरही अहवाल सादर केला आहे.
दरम्यान, सुटीवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 26 ऑक्टोबरला सीव्हीसीला 2 आठवड्यात तपास अहवाल सादर करण्यास सांगितले होते. वर्मा यांनी स्वतःला सुटीवर पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. केंद्र सरकारने वर्मा यांचे सर्व अधिकारी काढून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. राकेश अस्थाना यांनी लावलेले सर्व आरोप वर्मा यांनी नाकारले आहेत.