breaking-newsराष्ट्रिय

सीबीआय तपास अधिकाऱ्याची बदली

आयसीआयसीआय कर्जगैरव्यवहार: चौकशीत विलंब केल्याचा, माहिती फोडल्याचा ठपका

आयसीआयसीआय बँक कर्जगैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीला विलंब केल्याप्रकरणी आणि या प्रकरणाच्या चौकशीबाबतची माहिती फोडल्याच्या संशयावरून केंद्रीय अन्वेषण शाखेने (सीबीआय) पोलीस अधीक्षक सुधांशू धर मिश्रा यांची बदली केली आहे.

सीबीआयच्या सूत्रांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या कर्जाबाबत आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाल धूत यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २२ जानेवारीलाच तत्कालीन तपास अधिकारी मिश्रा यांची बदली सीबीआयच्या रांची येथील आर्थिक गुन्हे कक्षात करण्यात आली आहे.

नवे चौकशी अधिकारी मोहित गुप्ता यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर तीन हजार २५० कोटी रुपयांच्या या कर्जगैरव्यवहारात कोचर पती-पत्नी आणि धूत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने मुंबई आणि औरंगाबाद येथे छापे टाकले होते.

कुठलेही कारण न देता या कर्जगैरव्यवहाराची प्राथमिक चौकशी प्रलंबित ठेवल्याचा त्याचबरोबर सीबीआयचे छापे आणि त्या संदर्भातील इतर माहिती मिश्रा यांनी फोडल्याचा ठपका सीबीआयने त्यांच्यावर ठेवला आहे.

मिश्रा यांच्या बदलीच्या समर्थनासाठी सीबीआयने, या प्रकरणाची प्रलंबित चौकशी अचानक नियमित प्रकरणात रूपांतरित करण्यात आल्याचा दावा केला आहे. या प्रकरणातील मिश्रा यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचेही सीबीआयने स्पष्ट केले आहे. मिश्रा यांची बदली करताना सीबीआयने प्राथमिक चौकशी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मिश्रा यांच्या जागी विश्वजित दास यांची नेमणूक करण्यात आली आहे. दास कोलकाता येथे सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस अधीक्षक होते.

कर्जगैरव्यवहार काय?

व्हिडीओकॉन समूहाच्या पाच कंपन्यांना आयसीआयसीआय बँकेने एप्रिल २०१२ मध्ये ३२५० कोटी रुपये कर्ज दिले होते. समूहाने त्यातील ८६ टक्के म्हणजे २८१० कोटी रुपये बुडवले. बँकेने २०१७ मध्ये हे कर्ज अनुत्पादित जाहीर केले. हे कर्ज मंजूर करणाऱ्या समितीत चंदा कोचर यांचा समावेश होता. कर्ज मंजूर करताना कोचर यांनी नियमभंग करून कर्ज दिल्याचा आरोप आहे. व्हिडीओकॉनचे व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या ‘न्यूपॉवर रिन्यूएबल’ कंपनीत पैसे गुंतवले होते. चंदा कोचर यांनी या प्रकरणात ऑक्टोबरमध्ये राजीनामा दिला होता. आयसीआयसीआय बँक त्यांची स्वतंत्र चौकशी करीत आहे.

अस्थानांनंतर मिश्रा

सीबीआयने आपल्याच अधिकाऱ्याची चौकशी करण्याची अलीकडच्या काळातील ही दुसरी घटना आहे. सीबीआयने ऑक्टोबरमध्ये राकेश अस्थाना यांच्यावर लाचखोरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. त्यातून नंतर राकेश अस्थाना आणि सीबीआय प्रमुख आलोककुमार वर्मा यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आला होता.

सीबीआय भलतीकडेच -जेटली

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी ट्वीट करून सीबीआयने केलेल्या चौकशीवर प्रश्नचिन्ह लावले होते. लक्ष्य सोडून सीबीआय भलतीकडेच भरकटत आहे. चौकशीचे हे साहस दु:साहस ठरू शकते. व्यावसायिक चौकशी आणि असे दु:साहस यात फरक आहे, असेही जेटली यांनी म्हटले होते.

जेटलींच्या टीकेबद्दल आनंद -चिदम्बरम 

जेटलींपाठोपाठ माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनीही सीबीआयवर टीका केली आहे. सीबीआय अविचाराने काही बँकर्सना लक्ष्य करीत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही सीबीआयला तसे प्रमाणपत्र दिले आहे. सीबीआयच्या या कृतीबद्दल अखेर जेटलींनीच टीका केल्याने आपल्याला आनंद झाल्याचे ट्वीट चिदम्बरम यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button