सिरीयामध्ये चर्चा फिसकटल्यानंतर पुन्हा बॉम्बहल्ले सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Syrias-Afrin-.jpg)
दारा (सिरीया) – सिरीयामध्ये सरकार आणि बंडखोरांमध्ये झालेली चर्चा फिसकटल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार बॉम्बहल्ल्यांना सुरुवात झाली आहे. बंडखोरांच्या ताब्यातील दारा प्रांतात दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत डझनभर लोक मारले गेले आहेत. तर हजारो जणांना घरदार सोडून निघून जायला लागले आहे. हा हिंसाचार थांबवण्यासाठी रशियाच्या मध्यस्थीने चर्चा घडवून आणली गेली होती.
दारा शहरावर रशियाने 19 जून रोजी जोरदार बॉम्बहल्ले केले होते. मात्र त्यापेक्षाही अधिक भीषण हल्ले आज करण्यात आल्याचे वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने म्हटले आहे.
काल रात्रीपासून रशियाच्या लढाऊ विमानांनी बॉम्बहल्ले सुरू केले आहेत. रशिया आणि सिरीयाच्या विमानांमधून क्षेपणास्त्रे, क्रूड बॅरेल बॉम्ब टाकण्यात आले. बंडखोरांनी पुन्हा चर्चेस तयार व्हावे, यासाठीच हे हल्ले केले जात आहेत, असे बंडखोरांच्या गटाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. बंडखोरांच्या ताब्यातील दक्षिणेकडील 30 गावांनी आगोदरच शरणागती पत्करली आहे. त्यामुळे सिरीया सरकारच्या गटाचा 60 टक्के दारावर ताबा आला आहे.
कालच्या चर्चेमध्ये बंडखोरांना सिरीयाच्या अन्य भागात सुरक्षितपणे जाऊ देण्याची मागणी रशियाने फेटाळली.