‘सिक्कीम मधील 11 जमातींना अदिवासी म्हणून मान्यता द्या…’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/pawan-chamlin.jpg)
मुख्यमंत्री चामलिंग यांची केंद्र सरकारकडे मागणी
गंगटोक – सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनी केंद्र सरकारकडे राज्यातील 11 जमातींना अदिवासी म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. काल येथे आयोजित करण्यात आलेल्या एका अदिवासी मेळाव्यात बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे ते म्हणाले की यासाठीचे अधिकृत निवेदन केंद्र सरकारला लवकरच दिले जाईल. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे याचा पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले. गुरूंग, मंगर, राय, सुन्वर, मुखिया, जोगी, याखा, बहुन, छेत्री, आणि नेवार या जमातींना त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीनुसार अदिवासी म्हणून मान्यता मिळण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
या जमाती सध्या उपेक्षित जीवन जगत आहेत. त्यांनाही विकासाची संधी मिळायला हवी असे त्यांनी म्हटले आहे. प्रा. ए. सी. सिन्हा यांनी दिलेल्या अहवालात तशी शिफारस करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पण त्यांची ही शिफारस केंद्र सरकारच्या अदिवासी कल्याण विभागाने फेटाळून लावली आहे. त्यानंतरही सन 2005 साली नेमण्यात आलेल्या बी. के. रॉयबर्मन यांच्या समितीने दिलेल्या अहवालातही ही शिफारस आहे. या समितीने सन 2008 साली ही शिफारस केंद्र सरकारला केली आहे पण त्याकडे अजून केंद्र सरकारने लक्ष दिलेले नाही असे मुख्यंत्र्यांनी यावेळी नमूद केले.