सलग १३ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ
![Financial ruin to the common man; Diesel and petrol became more expensive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/petrol-pump.jpg)
मुंबई : लॉकडाऊन काळात सलग १३ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे आता महागाईचा भडका उडण्याचे संकेत मिळत आहेत. देशातील प्रमुख महानगरांत पेट्रोलचे दर हे ८० रुपयांच्यापुढे गेले आहेत. तेरा दिवसात ७ रुपयांनी पेट्रोल महाग झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवरील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा बोझा सतत वाढत आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यात इंधन वाढ होत असल्याने महागाईत अधिक भर पडले. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे कसे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आज पुन्हा एकदा तेल कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) भाव वाढविले आहेत. पेट्रोलच्या दरात ०.५६ रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमती ०.६३ रुपयांनी वाढल्या आहेत. बुधवारी पेट्रोलचा दर वाढून ७८.३७ रुपये झाला. तर डिझेल दरही वाढविण्यात आला आहे. डिझेलची किंमत प्रति लिटर ७७.०६ रुपयांवर पोहोचली.
लॉकडाऊनमुळे सरकारचा जीएसटी आणि इतर कर महसूल घटल्याने आता इंधन विक्रीतून जास्तीत जास्त कर वसूल करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून यावरुन आता राजकारण अधिक पेटण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपन्यांनी विमान इंधनाच्या दरात देखील वाढ केली. यामुळे विमान तिकिटाचे दर वाढण्याची शक्यता आहे.