सरसकट सर्व दहशतवाद्यांवर कारवाई करा…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/mike-pampeo.jpg)
- अमेरिकेचे विदेश मंत्री पॉम्पेओची पाकिस्तानला सूचना
वॉशिंग्टन – सर्व दहशतवादी गटांच्या विरोधात पाकिस्तानने सरसकट कारवाई करावी, अशी सूचना अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी पाकितानला केली आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमार जावेद बाजवा यांच्याबरोबरच्या उचस्तरिय बैठकीदरम्यान पॉम्पेओ यांनी ही सूचना केली असल्याचे समजते आहे.
पाकिस्तान आणि अमेरिका या दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चस्तरिय अधिकाऱ्यांवर निर्बंध घातल्यापासून दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरिय चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पॉम्पेओ यांनी जनरल बाजवा यांच्याशी दूरध्वनीवरून ही चर्चा केली. यावेळी पाकिस्तान आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करण्यात आली., असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिथर नौएर्ट यांनी सांगितले.
दोन्ही देशांनी अफगाणिस्तानमध्ये राजकीयदृष्ट्या सामंजस्य दाखवण्याची गरज आहे. तसेच दक्षिण आशियातील दहशतवादी संघटनांवर सरसकट कारवाई करण्याची गरज आहे, यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला.
पाकिस्तानमध्ये अफगाण तालिबान आणि हक्कानी नेटवर्कला सुरक्षित आश्रय मिळाला असल्याची तक्रार अमेरिका आणि अन्य देशांनी वेळोवेळी केली आहे. पाकिस्तानने मात्र हा दावा अमान्य केला आहे.
पाकिस्तानने गेल्या महिन्यात अमेरिकेच्या उच्चाधिकाऱ्यांवर निर्बंधे घातली. त्याच दिवशी अमेरिकेनेही पाकिस्तानच्या उच्चाधिकाऱ्यांना वॉशिंग्टनमध्ये 25 मैल परिघाबाहेर प्रवास करण्यास निर्बंध घातले आहेत.