समाजमाध्यमांच्या गैरवापराची भारताला चिंता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/vdh0231.jpg)
- दहशतवादाबाबत उपाययोजनांची मागणी; अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या अहवालात माहिती
इंटरनेट विशेष करून समाज माध्यमे व व्हॉटसअॅपसारखी उपयोजने यांचा वापर दहशतवादासाठी तरुणांची भरती करणे, मूलतत्त्ववादाची शिकवण देणे यासाठी केला जात असल्याबाबत भारताने वेळोवेळी चिंता व्यक्त केली असल्याचे अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या एका अहवालात म्हटले आहे.
व्हॉटसअॅपच्या माध्यमातून भारतातील काही पत्रकार, मानवी हक्क कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या ‘कंट्री रिपोर्ट्स ऑन टेररिझम’ या २०१८ या वर्षांच्या अहवालात म्हटले आहे,की भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी इंटरनेट, समाजमाध्यमे, व्हॉटसअॅप यांचा वापर दहशतवादासाठी तरुणांची भरती, मूलतत्त्ववादाची शिकवण, आंतरधर्मीय तेढ माजवणे यासाठी करण्यात येत असल्याबाबत वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. भारताचे गृह सचिव इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागतिक समाज माध्यम कंपन्यांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांना समाजमाध्यमांचा दहशतवादी कारवायांसाठी होणारा वापर रोखण्याची विनंती केली होती. दक्षिण भारतात समाजमाध्यमातून दहशतवादी कारवाया करण्याचे प्रकार झाले आहेत. त्यात आयसिससाठी अफगाणिस्तानात भारतातून तरुण पाठवण्यात आले. भारताने आतापर्यंत अनेक माओवादी व दहशतवादी हल्ले पाहिले आहेत. भारतीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सीमेपलीकडून दहशतवादासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचे म्हटले आहे. २०१८ मध्ये टू प्लस टू संवादात भारताने दहशतवादाबाबत गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करण्याचा मुद्दा मांडला होता. भारताने जूनमध्ये इस्लामिक स्टेट ऑफ इराक,खोरासन, आयसिस, अकिस (अल कायदा इन इंडियन सबकंटिनंट) या संघटनाना दहशतवादी संघटना जाहीर केले होते. भारतात २०१८ मध्ये जम्मू काश्मीर व ईशान्येकडील राज्यात दहशतवादाचा परिणाम झाला. मध्य भारतात काही ठिकाणी माओवादी दहशतवाद्यांनी हिंसाचार केला. भारतीय नेत्यांनी दहशतवादी हल्ले रोखण्याचा निर्धार केला असून त्यासाठी अमेरिका व समविचारी देशांचे सहकार्य घेतले आहे.