संरक्षणदृष्ट्या महत्वाच्या क्षेत्रात नौदलाकडून सहकार्यात वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/indo-china-.jpg)
- “शांग्री ला ‘ परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
सिंगापूर – भारताची सुरक्षा दले, विशेषतः नौदलाकडून संरक्षणदृष्ट्या महत्वाच्या भागांमध्ये शांतता सुरक्षितता आणि मानवतावादी सहकार्यासाठी व्यापक भागीदारी उभारली जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. प्रतिष्ठेच्या “शांग्री ला’ परिषदेमध्ये शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भाषणामध्ये मोदींनी दक्षिण पूर्व आशियातील सुरक्षा संबंधांवर भर दिला.
अग्नेय आशियातील दहा देशांच्या माध्यमातून हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागराला जोडले जाते. भौगोलिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही अर्थांनी हा भाग जोडण्याचे महत्वाचे कार्य करत आहे. त्यामुळे इंडो पॅसिफिक भूभागामध्ये सर्वसमावेशकता, खुलेपणा आणि “आसियान’ केंद्रीत एकता साधली जात असल्याचे मोदी म्हणाले. भारत हा इंडो पॅसिफिक भागाकडे संरक्षणदृष्ट्या बघत नाही किंवा मर्यादित सदस्यांच्या वर्चस्व गाजवणाऱ्या क्लबच्या रुपात बघत नाही. असेही “शांग्री ला’ परिषदेच्या आपल्या बीजभाषणामध्ये मोदी म्हणाले.
भारतीय लष्कर, विशेषतः नौदल हे इंडो पॅसिफिक भागामध्ये शांतता आणि सुरक्षिततेसाठी व्यापक भागीदारी उभारत आहे. भारतीय नौदलाकडून अग्नेय आशियामध्ये प्रशिक्षण, युद्धसराव आणि विधायक सदिच्छा मोहिमाही राबवल्या जात असतात. सिंगापूर आणि भारतादरम्यान गेल्या 25 वर्षांपासून कोणत्याही अडथळ्याविना नौदल सराव होत आला आहे. आता सिंगापूरबरोबर त्रिस्तरिय युद्धसरावही लवकरच सुरू होईल आणि “आसियान’देशांपर्यंत याची व्याप्ते वाढवली जाईल, अशी हमीही पंतप्रधानांनी दिली.
व्हिएतनामबरोबर परस्पर सामंजस्याने क्षमतावृद्धीसाठी भागीदारी केली जाते. अमेरिका आणि जपानबरोबर मलबार युद्धसराव केला जातो. हिंद महासागरात भारताच्या मिलान या युद्धसरावामध्ये तर पॅसिफिक महासागरातील “रिम्पॅक’ युद्धस्रावात अनेक देश सहभागी होतात, असेही मोदी यांनी सांगितले.
चाचेगिरी आणि सशस्त्र लुटारूंच्या विरोधातील कारवाईसाठीच्या प्रादेशिक सहकार्य करारामधील भारत हा सक्रिय देश आहे. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्ती निमित्त, म्हणजे 2022 पर्यंत नवभारताची उभारणी करणे ही आपल्या सरकारची मुख्य मोहीम आहे. आता जगानेही भेद आणि स्पर्धेच्या पुढे जाऊन एकत्रित काम करायला हवे, असे सांगताना पंतप्रधानांनी “आसियान’च्या 10 सदस्य देशांचे उदाहरण दिले.
अनेक क्षेत्रांमध्ये “आसियान’कडून एकसंधता साधली जाईल. अनेक क्षेत्रांबाबत “आसियान’ची प्रगती सुरू आहे. याचाच भाग म्हणून “इंडो पॅसिफिक’ भागाची पायाभरणीही केली गेली आहे. हा भाग नैसर्गिक भाग आहे. या भागात जागतिक संधी आणि आव्हानांचेही माहेरघर आहे. कोणत्याही अर्थाने भारत कोणत्याही देशाच्या विरोधी नाही. भौगोलिकदृष्ट्या “इंडो पॅसिफिक’ भागाबाबत भारताची दृष्टी सकारात्मक आहे. मुक्त, खुली, सर्वसमावेश भाग, समृद्धीचा समान कार्यक्रम स्वीकारणारा देश आहे, शब्दामध्ये मोदींनी भारताची भूमिका स्पष्ट केली.
सागरी भागाच समान वापर करण्याच्या अधिकारावर भर…
सागरी आणि हवाई भागाचा समान वापर करण्याच्या आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे असलेल्या हक्कांवरही पंतप्रधानांनी भर दिला. चीनकडून दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रावर हक्क सांगितला जाण्याच्या पार्श्वभुमीवर मोदींचे हे वक्तव्य होते. व्हिएतनाम, फिलीपाईन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान आदी देशांनी दक्षिण चीन समुद्रात दावा सांगितला आहे. अमेरिकेने अलिकडेच आपल्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडचे “पॅसिफिक कमांड’ असे नाव बदलून “इंडो पॅसिफिक कमांड’ असे केले आहे. अधिक व्यापक अर्थाने आणि भारताला महत्व देणारा हा बदल आहे.