शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/nana-patole-.jpg)
- सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
नवी दिल्ली – 2014 मधील लोकसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांसाठी झुरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राची सत्ता मिळताच बळीराजाच्या तोंडाला पाने पुसले आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसाठी मोदी हेच जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी माजी खासदार नाना पटोले यांनी आज केली.
कॉंग्रेसच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेस शेतकरी-शेतमजूर आघाडीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा समाचार घेतला. 2014मध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना मोदी यांनी शेतकऱ्यांवर आश्वासनांचा पाउस पाडला होता. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार पीकांना दीडपट हमीभाव देवू, सातबारा कोरा करू, कर्जमाफी देवू अशाप्रकारचे आश्वासन दिले होते.
मात्र, केंद्राची सत्ता मिळताच नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा बघायला मिळाला. त्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. विविध आमिष दाखवून देशाची सत्ता मिळविणारे मोदी हेच आत्महत्यांसाठी जबाबदार आहेत. यामुळे त्यांच्याविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे पटोले म्हणाले.
मोदी सरकारने एमएसपी जाहीर केली आहे. परंतु, पीकांची खरेदी करण्यासाठी केंद्र कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित करीत पटोले म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांची केवळ पिळवणूक करीत आहे. महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफीची रक्कम बॅकांकडे जमा न झाल्यामुळे बॅंकांनी खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज नाकारले. कारण कर्ज न फेडल्यामुळे तो डिफॉल्टर झाला. आता नाईलाजापोटी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे.