breaking-news

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच अतिक्रमणांवर हातोडा; आयुक्तांचे धाडसी पाऊल

औरंगाबाद | महाईन्यूज

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गुलमंडी, कुंभारवाडा परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी सकाळी अभुतपूर्व अशी कारवाई केली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दहा-दहा फूट अतिक्रमणे हटविण्यात आली. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी समोर उभे राहून कारवाईचा श्रीगणेशा केला. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गुलमंडी भागात ज्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे, ते स्वत:हून काढून घेण्यास त्यांनी सुरुवात केली.

महापालिकेची ही मोहीम नियोजित नव्हती. पैठणगेट, टिळकपथ येथील व्यापाऱ्यांनी मनपा आयुक्त, पोलीस आयुक्तांना हातगाडी, फेरीवाल्यांचा बंदोबस्त करावा म्हणून निमंत्रित केले होते. व्यापाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा केल्यानंतर एका व्यापाऱ्याने कुंभारवाड्यातील अतिक्रमणांकडे अंगुलीनिर्देश केला. मनपा आयुक्तांनी जागेवर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्येच कारवाईला सुरुवात करण्यात आली. पैठणगेट येथे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यापाऱ्यांसोबत विविध प्रश्नांवर चर्चा केली.
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या मांडल्या. पी-१, पी-२ पार्किंगची सोय करून द्यावी, रस्ता वन-वे असावा, हातगाड्या, फेरीवाल्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. पैठणगेट येथील मनपाच्या पार्किंगच्या जागेवर बहुमजली पार्किंगची इमारत बांधून देण्याचा प्रस्ताव व्यापारी महासंघाने मांडला. हा प्रस्ताव लेखी स्वरूपात द्यावा, अशी सूचना मनपा आयुक्तांनी केली.

या सकारात्मक चर्चेनंतर एका व्यापाऱ्याने गुलमंडी, कुंभारवाड्यातील अतिक्रमणांकडे बोट दाखविले. त्यामुळे मनपा आयुक्त स्वत: वस्तुस्थिती पाहण्यासाठी कुंभारवाड्यात दाखल झाले. अरुंद रस्त्याची परिस्थिती पाहून क्षणभर आयुक्त अवाक् झाले. त्यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांना फौजफाटा घेऊन बोलावले. बाराभाई ताजिया ते कुंभारवाडा कॉर्नरपर्यंत एका पथकाला अतिक्रमणे काढण्याचा आदेश दिला. दुसऱ्या पथकास औरंगपुरा भाजीमंडईपासून कुंभारवाड्यातील सर्व अतिक्रमणे काढण्यास सांगितले. मनपाच्या पथकाने क्षणार्धात पाडापाडीला सुरुवात केली. व्यापाऱ्यांना आपले साहित्य काढण्यासही वेळ मिळाला नाही. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत कुंभारवाड्यील सर्व दुकाने बंद झाली. मनपाच्या पथकाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले लोखंडी शेड, ओटे, पायऱ्या, पक्की बांधकामे पाडायला सुरुवात केली. अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना मनपाला सिटीचौक पोलिसांचेही सहकार्य मिळाले. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी पवार कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते. मनपाचे उपायुक्त रवींद्र निकम, पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरीक्षक आर.एस. राचतवार, मझहर अली, सागर श्रेष्ठ, पोलीस निरीक्षक फहीम हाश्मी,
नागरी मित्र पथकाचे कर्मचारी उपस्थित होते. बुधवारी महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम कोठून सुरू होणार याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button