Breaking-newsआंतरराष्ट्रीय
शरीफपुत्रांना ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानच्या हालचाली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/nawaj-sharif.jpg)
- रेड कॉर्नर नोटिसा बजावण्यासाठी इंटरपोलला घातले साकडे
इस्लामाबाद – पाकिस्तानने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या दोन पुत्रांना ताब्यात घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्या अटकेसाठी रेड कॉर्नर नोटिसा जारी कराव्यात, असे साकडे पाकिस्तानने इंटरपोलला घातले आहे.
सध्या तुरूंगात असणारे शरीफ यांच्याबरोबरच हसन आणि हुसेन या त्यांच्या पुत्रांविरोधात भ्रष्टाचाराचे तीन खटले दाखल आहेत. सुनावणीसाठी हजर न राहिल्याने हसन आणि हुसेन यांना न्यायालयाने फरार म्हणून जाहीर केले आहे.
त्यांच्याविरोधात न्यायालयाने अटक वॉरंटही जारी केले आहे. आता त्यांच्या अटकेच्या उद्देशाने पाकिस्तानने पुढचे पाऊल उचलले आहे. त्या देशाची प्रमुख तपास संस्था असणाऱ्या एफआयएने हसन आणि हुसेन यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटिसा जारी करण्यात याव्यात, अशी विनंती करणारा अर्ज फ्रान्समधील इंटरपोलच्या मुख्यालयात सादर केला आहे.
हसन आणि हुसेन यांच्या आई कुलसूम नवाज यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची देखभाल करण्यासाठी ते दोघेही लंडनमध्ये राहत आहेत. त्यांचे तिथून प्रत्यार्पण झाल्यास शरीफ कुटूंबीयांच्या अडचणींत भर पडणार आहे. शरीफ यांच्याबरोबरच त्यांच्या कन्या मरियम आणि जावई सफदर भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरल्याने सध्या तुरूंगात आहेत.