वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये ३११ दहशतवाद्यांचा खात्मा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Indian-Army-new-photo-67.jpg)
जम्मू आणि काश्मीरमध्ये २०१८ मध्ये सुरक्षा दलांनी ३११ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. लष्कराच्या १५ कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल कुमार भट्ट यांनी सोमवारी ही माहिती दिली. सुरक्षा दलातील चांगला समन्वय आणि मोहिमेसाठी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दशकभरात इतक्या संख्येने दहशतवादी मारले गेले नव्हते. यापूर्वी २०१० मध्ये २३२ दहशतवादी मारले गेले होते.
गृह मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. मागील वर्षी ३४२ दहशतवादी हल्ले झाले होते. तर यावर्षी डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यापर्यंत ४२९ हल्ले झाले होते. मागील वर्षी ४० सर्वसामान्य नागरिक मारले गेले होते. तर यंदा हाच आकडा ७७ इतका झाला. यावर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ८० जवान शहीद झाले. मागील वर्षीही ८० जवान शहीद झाले होते.
दहशतवाद्यांना स्थानिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. ज्या ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असते तेव्हा स्थानिकांकडून दगडफेक केली जाते.
यावर्षी एकूण ३११ दहशतवादी ठार झाले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा आकडा २२३ होता. मागील ३ आठवड्यात ८८ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये ९३ दहशतवादी विदेशी होते. १५ सप्टेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या घोषणेनंतर ८० दिवसांत ८१ दहशतवादी ठार झाले. तर २५ जूनपासून १४ सप्टेंबरदरम्यान ५१ दहशतवादी ठार झाले.