लैंगिक अत्याचार प्रकरणी भाजपा युवा मोर्चाचा नेत्याला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/mla-sun-rape-Frame-copy-1.jpg)
महाईन्यूज | दिल्ली
हैदराबादमधील सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळी आहे. एकीकडे देशभरामध्ये या प्रकरणावरुन वादळ उठले असतानाच हैदराबादमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजपा युवा मोर्चाच्या एका नेत्याला तेलंगण पोलिसांनी अटक केलेली आहे. अशिष गौड असे या तरुणाचे नाव असून तो भाजपाच्या युवा मोर्चाचा सभासद तसेच भाजपाचे आमदार नंदेश्वर गौड यांचा मुलगा आहे.रविवारी एका मॉडेलने दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. हैदराबादमधील हॉटेल मधापूर येथे आशिषने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे या मॉडेलने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. यासंदर्भात एका वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे हैदराबादमधील पशुवैद्यकीय तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ शनिवारी शहरात काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये आशिष सहभागी झाला होता. यासंदर्भातील पोस्टही त्याने फेसबुकवर पोस्ट केली होती. मात्र या मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अशिषला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.आशिषवर आरोप करणाऱ्या मॉडेलने दाखल केलेल्या तक्रारीनुसार हॉटेलमध्ये अशिष आणि त्याच्या दोन मित्रांनी काही मुलींची छेड काढली. शहरामध्ये काही दिवसांपूर्वीच घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात असल्याने पोलिसांनी तातडीने या तक्रारीची दखल घेत भाजपाच्या आमदार पुत्राला अटक केली आहे.