लीबियात आत्मघाती हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/libya-suicide-bombing.jpg)
त्रिपोली : लीबियाच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर आत्मघातकी हल्लेखोराने घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात किमान १२ जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यात सात जण जखमी झाले आहेत, असे आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा असलेल्या ‘गव्हर्न्मेंट ऑफ नॅशनल अॅकॉर्ड’ने म्हटले आहे. ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
चार शस्त्रधारी हल्लेखोरांनी या इमारतीवर हल्ला केला, असे लीबियाच्या या राजधानीच्या शहरातील वरिष्ठ सुरक्षा अधिकारी महंमद अल् दमजा यांनी ‘एएफपी’ वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. लीबियामध्ये २०११ मध्ये यादवी उसळल्यानंतर, निवडणूक आयोग या वर्षी निवडणूक घेईल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला. संयुक्त राष्ट्रांकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.