लष्कराच्या ‘एअर कॅव्हलरी’तंत्राचा राजस्थानमध्ये सराव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/air-cavalry-.jpg)
जयपूर – जमिनीवरील शत्रूला शोधून काढून टिपण्याचे तंत्र असलेल्या ‘एअर कॅव्हलरी’ चा सराव लष्कराच्यावतीने आज राजस्थानच्या वाळवंटी भागात करण्यात आला. व्हिएतनाम युद्धामध्ये अमेरिकेच्या सैन्याने या तंत्राचा अवलंब केला होता. संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी लष्कराने लष्कराच्या “एअर कॅव्हलरी’ अंतर्गत शस्त्रसज्ज हेलिकॉप्टरचा वापर केला. यावेळी रणगाडे आणि लष्कराच्या पायदळाचाही सहभाग होता.
लष्कराची मारक क्षमता वाढवण्यासाठी हल्ले करणाऱ्या हेलिकॉप्टरच्या खरेदीवर लक्ष केंद्रीत करून हा सराव करण्यात आला होता. “एअर कॅव्हलरी’ ही संकल्पना भारतीय लष्करासाठी नवीन आहे. शत्रूवर हवेतून आणि त्याचवेळी रणगाड्यांच्या माध्यमातून एकाचवेळी हल्ले करण्याचे हे तंत्र आहे. नुकतेच सुरतानगड येथील महाजन फायरिंग रेंजमध्ये झालेल्या “विजय प्रहार’ या युद्धसरावादरम्यान लष्कराच्या नैऋत्य विभागाच्यावतीने “एअर कॅव्हलरी’चा प्रयोग करण्यात आला होता, असे लष्कराचे प्रवक्ते ले. कर्नल मनिष ओझा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
या तंत्राचा वाळूच्या मॉडेलवर व्यवस्थित अभ्यास केल्यावर त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती.
सर्वसाधारणपणे जेंव्हा काही कारणाने भूदळ शत्रूचा लक्ष्य करू शकत नसते, तेंव्हाच हेलिकॉप्टरला पाचारण केले जाते. हेलिकॉप्टरमधून शत्रूचा अचूक वेध घेतला जातो. त्यावेळी एकाचवेळी अनेक लक्ष्यांचा वेध घेतला जाऊ शकतो. म्हणूनच “एअर कॅव्हलरी’ संकल्पनेचा अभ्यास आवश्यक होता.
लष्करामध्ये अचूक सेन्सर असलेली आणि शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर समाविष्ट केली जात आहेत. लष्करासाठी अशा हेलिकॉप्टरची निर्मिती हिंदुस्थान एरोनॉटिककडून केली जात आहे. संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 4,168 कोटी रुपये किंमतीच्या 6 अत्याधुनिक अपाचे हेलिकॉप्टरच्या खरेदीस मज़ूरीही दिली आहे.